Friday, June 24, 2016

मुगडाळ उत्तप्पा विथ होममेड पनीर मसाला

"मुगडाळ उत्तप्पा विथ होममेड पनीर मसाला"

एकदम भन्नाट पौष्टिक आणि विविध प्रोटीनयुक्त मॉर्निंग न्याहारी,



नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो...
आधी माफी मागतो कारण मध्यंतरीच्या कालावधीत मी अनेकानेक डिशेस केल्या , परमेश्वराच्या कृपेने सगळ्याच डिशेस खरच छान ही झाल्या पण माझ्या स्वतःच्या कार्य बाहुल्यामुळे मला त्या डिशेस ची रेसिपी इथे माझ्या या ब्लॉग वर टाळता आल्याच नाहीत.
आत्ताही तसा मी फार मोकळा आहे अस नाही पण जे पदार्थ मी करतो आणि जे खरच फार छान पौष्टिक असतात म्हणूनच मी करतो ते सर्वच्या सर्व पदार्थ तुम्हीही घरी करावेत आणि मस्त पौष्टिक पदार्थ तुम्ही तुमच्या  घरी कुटुंबियांसमवेत हसतखेळत धम्माल करत खावेत असे मला नेहेमीच वाटत आले आहे म्हणूनच खरतरं हा ब्लॉग प्रपंच...
असो...
मध्यंतरी मी ही डिश  केली होती सकाळी सकाळी आणि मस्त जबऱ्या झाली होती ही डीश चवीला...
चला तर मग आज करूया मुगडाळ उत्तप्पा विथ पनीर मसाला....

--------------------------------------------------------------------------------------------
या डिश साठी वापरलेलं पनीर माझा मोठा मुलगा चि. ओम याने घरच्या घरीच तयार केलं होत.
त्याची कृती खाली देतो आहे ,

सगळच्या सगळ घरी करण यासारख सुख नाही खर सांगतो,
आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे आपलं अख्खं कुटुंब या प्रोसेस मध्ये जेव्हा इन्वोल्व्ह होतं तेव्हा तर नंतर हा पदार्थ खाण्यासारख निव्वाल सुख घरात दुसर असूच शकत नाही.....
असो, 

मुळात आदल्या दिवशी संध्याकाळी एक लिटर दुध तापवताना ओम च्या लक्षात आलं कि दुध खराब झालं आहे तेव्हा त्या दुधाचं पनीर करण्याचा त्याचा मानस त्याने मला बोलून दाखवला,
मी लगेच हो म्हटलं आणि या पनीरचा लगेच उपयोग करून घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळीच्या ब्रेकफास्ट साठी ही डिश प्लान केली.
खालील पद्धतीने ओमने घराच्या घरी  पनीर तयार केलं.
ज्यावेळी दुघ नासलं आहे हे त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने ते दुध एका मोठ्या पातेल्यात घेतलं आणि मध्यम अग्नीवर  तापवायला सुरुवात केली.
हे दुध तापवताना सतत हलवत राहायचे आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो....
दुध हळू हळू तापल्यावर मध्येच या दुधावर हळू हळू आतल्या वाफेचे बबल्स तयार झाले ,
आता हे बबल्स हळूच वर येऊन एकाच वेळी फुटतात आणि हे फुटल्या फुटल्या आपल्याला gas आता बंद करायचा आहे.
आता एक पांढरा स्वछ्छ तलम कपडा त्याने घेतला आणि एका मोठ्याश्या भांड्यात एक आत बसेल एव्हढी चाळणी ठेवली.
आता तो तलम पांढरा कपडा त्याने त्या चाळणीच्या तोंडावर पसरला आणि थोडासा आत दाबून आता त्या फडक्यावर त्याने भांड्यात तापवलेलं ते दुध हळूहळू ओतायला सुरुवात केली.
सर्व दुध आत ओतून झाल्यावर हे प्रकरण असच पंधरा मिनिटे असंच ठेवलं.
आता पंधरा मिनिटांनंतर त्या कापडाची त्याने, घट्ट दुध आणि पनीरचे मूळ रूप असलेला पांढरा पदार्थ मध्यभागी राहील, अशी पुरचुंडी विशेष दाब न देता बांधली आणि आता ही पुरचुंडी आतलं पात्तळ पाणसर दुध निघून जाईल इतपतच दाबत दाबत गाठ मारत सिंकवर टांगून ठेवली.

ही गाठ फार घट्ट मारू नका पनीरचे रिच टेक्स्चर निघून जाते अन्यथा, अशी माहिती ओमने मला पुरवली,
आता तब्बल अर्ध्या तासानंतर त्याने ती पुरचुंडी काढली आणि ओट्यावर ठेवून त्यावर जड असा वरवंटा या पुरचुंडी वरून प्रेमाने फिरवला (फार जोरात नको, नाहीतर तलम फडका फाडून पनीर बाहेर अवतीर्ण होईल) जेणेकरून आत तयार झालेल्या बेसिक पनीरला आडव्या घट्ट लादी सारखा शेप येईल.
आता ही पुरचुंडी फ्रीज मध्ये ठेवली , 
साधारण एका तासानंतर ही पुरचुंडी ओमच्या सांगण्यावरून मी उघडली आणि "आजी म्या ब्रह्म पहिले" अशी माझी अवस्था झाली आतले पांढरे शुभ्र अक्षरशः घरगुतीच तयार केलेले ते पौष्टिक पनीर पाहून....

आता हे पनीर तुम्ही लगेच वापरू शकता अथवा त्याच कापडात गुंडाळून फ्रीज मध्ये असेच ठेवा . मी ते असेच तिथेच ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या या मुग डाळ उत्तप्यात वापरले.
साधारण एक लिटर गाईच्या दुधापासून १४० ग्राम पनीर तयार झाले. 
 चला तर मग आता माझी रेसिपी बघूया ,

"मुगडाळ उत्तप्पा विथ पनीर मसाला"


साहित्य 

दोन कप मुग डाळ 

(आवडत असेल तर बाजारात छिलका मुग डाळ म्हणून एक प्रकार मिळतो तो आणा ,
प्रोटीन्स सोबतच भरपूर फायबर्स सुद्धा आयेतच मिळतात आपल्याला, मी हेच घेतले होते )
१ चमचा मीठ
दीड चमचा दाणेदार साखर
पाच चमचे लिंबू रस
दीड चमचा धने पावडर
दीड चमचा जिरं पावडरपांढरे तीळ अर्धा चमचा हिंग चिमुटभर 
१ चमचा जिरं४ चमचे हिरवीगार फ्रेश बारीक कापलेली कोथिंबीरएक चमचा कसुरी मेथी (किंचित कडवट चव छान लागते, आवडत नसल्यास वापरली नाही तरी चालेल)२ चमचे  साजूक  तूप (तुपावर केल्यास भन्नाट लागते)कांदा एक
बारीक चिरलेला 
हिरव्या मिरच्या दोन आलं छान सातारी एक इंच तुकडा कडीपत्ता दोन चमचे 


आधीची तयारी 


मुगडाळ रात्रभर भिजवून ठेवा. शक्यतो रात्री उशिरा भिजवा म्हणजे सकाळी सकाळी ही डिश करता येईल.
सकाळी या भिजलेल्या डाळीत मस्त हिरव्या चुटूक मिरच्या घाला , एक चमचा जिरं घाला, थोडंस आलं घाला , किंचित हिंग घाला , कच्चाच कांदा घाला, एक चमचा कडीपत्ता घाला, कोथिंबीर घाला, चवीपुरते मीठ घाला आणि आता मिक्सरच्या भांड्यात घालून याची उत्तपा घालता येईल इतपत छान पेस्ट तयार करा.
जास्त घट्ट नको आणि जास्त पात्तळ ही नको बरं.

कृती 




 आता एका बाजूला पनीर मसाला तयार करूया 

एका तव्यावर साजूक तूप घालून त्यात तूप जरासे तापल्यावर आता आधी एक चमचा कडीपत्ता घालून किंचित परत आता यात  बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि आलं घालून छान गुलाबी होईस्तोवर कांदा परता आणि आता परतल्यावर आता यात पांढरे तीळ घालून खरपूस भाजून घ्या.
चवीपुरते मीठ घाला आणि साखरेचे थोडेसे दाणे घाला.

आता यात हाताने क्रश केलेले पनीर घालून वर धने, जिरं पूड घालून मस्त हळुवार परता ,
आता हे झाल्यावर यात कसुरी मेथी टाका आणि व्यवस्थित परता, खाली लागणार नाही याची काळजी घ्या.
यावेळी इथे हात किंचित ओला करून त्या ओल्या हाताच्या पाण्याचा अलगद किंचित हबकारा या तयार होत असलेल्या डिश वर मारा,
पनीर मसाला मस्त तयार होतो यामुळे.....
हे सगळ करताना अग्नी बऱ्यापैकी मंद ठेवा म्हणजे पनीर छान खरपूस भाजून निघते आणि छान लागते.
आता यावर लिंबू रस पसरून टाका.
आता हा तयार झालेला मसाला मंद विस्तवावर ठेवून द्या.
अथवा विस्तव बंद करून झाकण घालून तसाच ठेवून द्या.

मला माहितीये आत्तापर्यंत घरच्यांना भूक लागली आहे बट कांट हेल्प, उत्तप्पा व्हायचा आहे न अजून मित्रांनो आणि मैत्रिणींनो....... 

आता शेजारच्या gasvar उत्तप्पा घालूया.

तव्यावर किंचित तेल पसरून तवा तापल्यावर त्यावर उत्तप्याचे जे पीठ आपण तयार केले आहे ते मध्यभागी घाला आणि गोलाकार फिरवत एकसमान पीठ पसरून घ्या.
मुग जरासे चिकट असल्याने वरून परत सारखे करावे लागणार नाही अश्या हलक्या हाताने पीठ तव्यावर पसरा म्हणजे काढताना हळुवार निघतील.
आता यावर कढइचे झाकण झाकून ठेवा आणि बाजूने किंचित वाफ बाहेर येताना दिसली रे दिसली कि झाकण काढून पहा आणि उत्तप्पा फिरवा.
आता फिरवलेला उत्तप्पा तयार होतो आहे.

या सगळ्याचा भन्नाट वास घरादारात पसरला आहे .

आता घराचे थांबणे शक्य नाही.

आता सगळ्यांना मस्त हक मारा.

डायनिंग टेबलावर प्लेट्स मांडा , त्यात हा उत्तप्पा घाला आणि शेजारी पनीर मसाला ठेवा आणि आवडत असेल तर खोबर-कोथिंबीर-मिरची-जिरं चटणी सोबत करून घ्या, छान लागते ,
मी हीच घेतली होती.....

भरपेट खा...आरोग्यदायी रहा...खुश व्हा...मस्त जगा


देव बरा करो.........



Friday, March 4, 2016

टर्को-डेझी




आपण बऱ्याचदा पंचतारांकीत  हॉटेल्स मध्ये जात येत असतो,
इथला बुफ़े जेवणं हा खरतरं एक विलक्षण अनुभव असतो माझ्यासाठी,
पण त्यातल्या त्यात म्हणालं तर इथे गेल्यावर इतर सगळ्या पदार्थांसोबत एक सेक्शन मात्र नेहेमीच माझे लक्ष वेधून घेतो आणि तो सेक्शन म्हणजे दुसर तिसर काही नसून तो विभाग असतो रंगारंग स्वादिष्ट डेझर्टस चा सेक्शन…

कुठल्याही व्यक्तीचा मूड फुलवण्याचा , आसमंतात आनंदी वातावरण दरवळवण्याचा , द्रुष्टीसुखच नव्हे तर अमर्याद जिव्हासुखही पोचवण्याचा , अदभूत रंगसंगतीची मर्मभेदी उधळण आणि जोडीला विविध चवींचा आधी तोंडात आणि नंतर तिथून थेट मेंदूमध्ये स्वादांचा प्रसन्नचित्त आनंदी निधान पेरणारा असा हा डेझर्टस चा सेक्शन… 

चला तर मग , जास्त वर्णन नको , आता या भन्नाट टर्को-इटालियन डेलीकेसीची रेसिपीच पाहुया…. 

विलक्षण टेस्टी होते हे क्यूझिन मित्रांनो आणि मैत्रिणींनो…. 
मी केलं आहे आणि आम्ही सर्वांनी मस्त चाखलही आहे फक्त एकच नम्र विनंती आहे की आधी ही  पूर्ण  रेसिपी एकदा , दोनदा, तीनदा नीट वाचा , परत परत वाचा , नीट  समजून घ्या, काही अडलच तर बेझिझक थेट मला विचारा आणि नंतरच करा…प्लीज प्लीज प्लीज 

चला तर मग समजावून घेऊया 


(या डिश मध्ये कटर ही एक महत्वाची वस्तू आहे मित्र मैत्रिणींनो,
भांड्यांच्या दुकानात मिळते हि साधारण ७० रुपयांना,
नक्की घेऊन या हि वस्तू,
खूप उपयोगाची असते हे साधन. )

साहित्य 


स्ट्रॉबेरीज - २५ छान लालबुंद टपोऱ्या स्ट्रॉबेरीज , या चांगल्या मस्त पिकलेल्या आणि गोड घ्या , जितक्या स्ट्रॉबेरीज गोड तितकी आपली डीश भन्नाट (बाजारात स्ट्रॉबेरीजचे प्लास्टिक डबे मिळतात बघा चौकोनी, त्या एकात साधारण १२ स्ट्रॉबेरीज असतात अस म्हटलं तरं   साधारण दोन ते तीन स्ट्रॉबेरीजचे डबे  होतात) ,
काळी द्राक्षे - साधारण ८ ते १० मोठी टपोरी, लहान असतील तर सरळ १५ घ्या . ही द्राक्षे आधी २-४ वेळा छान वाहत्या पाण्यातून धुवून घ्या आणि नंतर पाण्यात बुडवून ठेवा आणि प्रत्यक्ष वापरण्या आधी कोरड्या कपड्यात व्यवस्थीत पुसून घ्य. हल्ली या द्राक्षांना खूप केमिकल्स मारलेली असतात म्हणून ही काळजी घेतलेली बरी.  
द्राक्षअजिबात जास्त घेऊ नका "काय फरक पडतो" म्हणतं , फक्त ८-१० च घ्या ,
लाल रंग जाइल नाहीतर डीशचा आणि अकारण काळपट रंग  येईल , जो बोअर दिसेल, चवीत फरक पडत नाही विशेष पण जे खातो ते छान तर दिसले पाहिजे ना यार ? 
पाणी - १५० मिलीलीटर 
साखर - १५० ग्राम
काळी मिरी - चार
(जास्त नको, याची आधीच पूड करून ठेवा )
वेलदोड्यांची पावडर - २ (वेलचीची सालं  नका घेऊ, ती चहाच्या बरणीत टाका, चहाला छान वास येतो मागाहून , वेलची सोलल्यावर काळ्या बिया असतात आत, याची आधीच पूड करून निराळी ठेवा ) पुदिना - चार ते पाच हिरवीगार पाने व्यवस्थित धुवून ठेवा 
३ स्लाईस पांढरा ब्रेड (व्हीट ब्रेड अजिबात नको...किंचित वापरतो आपण इथे हा नेहेमीचा मैद्याचा साधा व्हाईट ब्रेड...त्यामुळे हाच मैद्याचा साधा व्हाईट ब्रेडच वापरावा)

पाककृती 

सर्वप्रथम सर्व साहित्य तयार ठेवा .

आता घेतलेल्या सगळ्या स्ट्रॉबेरीज पैकी अर्ध्या स्ट्रॉबेरीजचे तुकडे करून ठेवा,

सगळच्या सगळ पाणी एका नॉन -स्टिक पसरट भांड्यात घ्या आणि मोठ्या  विस्तवावर पाण्याला एक उकळी आणा आता उकळी आल्यावर विस्तव लहान करा. 

घेतलेल्या साखरेचे तीन भाग करा . 

आता लहान विस्तवावर असलेल्या या पसरट भांड्यात तीन पैकी एक भाग साखर टाका आणि सतत ही साखर लाकडी चमच्याने ढवळत रहा, आता ही साखर विरघळल्यावर पुढचा भाग टाका आणि हा भाग विरघळल्यावर आता शेवटचा भाग टाका आणि व्यवस्थित हलवा. 

सगळी साखर विरघळून गेली कि आता भांड्याच्या तळाशी पांढऱ्या रंगाचे बुडबुडे फॉर्म होऊ लागतात , अजिबात घाबरू नका , हे होतंच  आणि असंच होत, नॉर्मल आहे , फक्त पेशंस ठेवून साखर असलेलं  हे द्रावण अजूनही असाच ढवळत रहा. 
आपल्याला मूळ असलेलं द्रावण साधारण निम्म्या मापाचं करायचं आहे. पूर्ण साखर विरघळली कि नंतर साधारण लहान विस्तवावर १० मिनिटे लागतात हे पाणी बरोबर अर्धे व्हायला. 

आता मूळ  जे पाणी आपण घेतलं होतं ते अर्ध झाल आहे अस आपण समजूया. 


आता या साखरेच्या द्रावणात अर्ध्या स्ट्रॉबेरीजचे मगाशी केलेले तुकडे  घाला आणि सगळ्या द्राक्षांचे केलेले तुकडे नंतर घाला आणि आता विस्तव लहान ठेवून आता हे सगळे मिश्रण साधारण १० मिनिटे ढवळत रहा . 


द्राक्ष आणि स्ट्रॉबेरीज  पूर्णपणे विरघळून बर्यापैकी एकजीव होतात आणि या दोन्ही फळांचा साधारण दृश्य स्वरूपात लगदा तयार होतो. 

आता हे सगळे मिश्रण पंख्याखाली ठेवून बऱ्यापैकी गार करा आणि आता एका मोठ्या चाळणीत हे सगळ मिश्रण घेऊन साखरेच्या पाकातला ज्यूस जाडसर गाळून घ्या. 



आता आपल्याकडे असलेल्या एखाद्या गोलाकार कटर च्या सहाय्याने ३ ब्रेडचे तुकडे कट करून घ्या. 



आता या कापलेल्या ब्रेडच्या तुकड्यांवर चमच्याच्या सहाय्याने आपल्या जाडसर ज्यूस व्यवस्थित पसरून घ्या. 

हा ज्यूस ब्रेडने व्यवस्थित शोषून घेतला पाहिजे , हा ब्रेड आता थोडा थोडा ज्यूस पुन्हा पुन्हा शोषत जाईल, जेव्हढा जेव्हढा ज्यूस ब्रेड शोषत जाइल तितका तितका हळुवार मुरवत चला.



आता उरलेला ज्यूस पुन्हा मगासच्या पसरट भांड्यात घ्या.  यात अजून एक २५ मिली पाणी घाला आणि आता यात उरलेली अर्धी स्ट्रॉबेरी  यात घाला आणि व्यवस्थित शिजवून घ्या . 

मिश्रण मगासच्या सारखे साधारण एकजीव झाले कि आता विस्तव बंद करा आणि आता यात काळी मिरी पावडर घाला , वेलची पूड घाला आणि पुदिन्याची पाने कुस्करून पसरून  घाला. 

आता पुन्हा हे सगळे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या आणि आता अगदी जर वेळ म्हणजे साधारण २-३ मिनिटे पंख्याखाली थंड करायला ठेवा. 

आता मगासच्या कटर मध्ये खाली ज्यूस मध्ये भिजवलेला ब्रेड ठेवा , थोडा दाबून ठेवायला लागतो कारण आता या ब्रेडच्या तुकड्याने ज्यूस मुरवून घेतला आहे. 



आता थंड केलेले मिश्रणाचा, या ब्रेडच्या तुकड्यावर एक लेअर चमच्याने घाला . 



आता दुसरा ब्रेडचा तुकडा या कटर मध्ये सरकवा आणि पुन्हा आपले तयार मिश्रण यावर घाला आणि आता शेवटचा तुकडा वर ठेवा आणि वरून अजून ज्यूस घाला . 

आता आपली स्वादिष्ट जादू ९०% तयार झाली आहे. 

आता हा कटर अलगद उचला आणि ही डीश आता अशीच्या अशी फ्रीजर मध्ये फक्त ५ मिनिटांसाठी ठेऊन द्या , फक्त पाच म्हणजे फक्त पाच मिनिटांसाठी बर .
जास्त ठेऊ नका नाहीतर चव बदलेलं. 

चला तर मग...झटपट रेसिपी आहे...मुलांनाच नाही तर आपणा मोठ्या माणसांना ही भन्नाट आवडेल बघा ही जबऱ्या डीश नक्कीच.  

आता मस्त हि डिश समोर ठेवा ,

आणि करा सुरुवात हाणायला ,

इथे डिशचे जे साहित्य दिले आहे यामध्ये साधारण एक डिश तयार होते. 


रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  हि डिश केल्यानंतर नक्की कळवा....

भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा




देव बरा करो.........

Monday, September 7, 2015

काश्मिरी- लझीझ



"गर फिरदौस बर-रूऐ जमीं अस्त...
हमी अस्तो, हमी अस्तो, हमी अस्त..!!!"
(अगर इस जमीं पर कहीं स्वर्ग का अस्तित्व है, तो वो यहीं है, यहीं है और यहीं है.!!!.)

काश्मीर...
इथल सगळंच न्यार
इथला निसर्ग न्यारा...इथली माणसे न्यारी...आणि या भूतलावरच्या स्वर्गाच्या माणसांचे अन्न हि न्यारेच...

माझ्या एका अतुलनीय सौन्दर्यवती काश्मिरी पंडित मैत्रिणीने मला शिकवलेली हि एक अदभूत रेसिपी...

अंतर्बाह्य सुंदर असलेली काश्मिरी हिंदू माणसे , त्यांचे अस्सल जातिवंत काश्मिरी मसाले , त्यांची मनापासून स्वयंपाक करण्याची तळमळ आणि प्रत्येक गोष्ट हातानेच, कुठल्याही यंत्राचा आधार न घेता करण्याची धडपड यामुळेच काश्मिरी पंडितांची हि प्युअर व्हेज डिश जबऱ्या भन्नाट लागते मित्रांनो आणि मैत्रिणींनो...

तुम्हाला सुद्धा हि डिश आवडेल हे नक्की..

चला तर मग बघुया थेट हि डिश...
काश्मिरी लझीझ 

साहित्य

फ्लॉवर - अर्धा किलो
भेंडी - पाव किलो
बटाटे - मध्यम आकाराचे ३
आलं - दीड इंची तुकडा किसलेला
हिरवी मिरची - २ मध्यम तिखट मिरच्या
काश्मिरी तिखट - १ मध्यम चमचा
साखर - १ चमचा
मीठ - १ चमचा
कोथिंबीर - ४ चमचे
बदाम - १५ (उभे चिरून एका बदामाचे २ पात्तळ कप करून घ्या)
जिरं - २ मध्यम चमचे
दालचिनी - २ इंची तुकडा
जायफळ - एक चमचा किसून पावडर
वेलची - ५ हिरव्या वेलच्या
काळी मिरी - १० अख्या मिऱ्या
साजूक तूप - ४ चमचे
घट्ट गोड दही - २५० ग्राम
कसुरी मेथी - एक चमचा

पाककृती

पहिली तयारी....

फ्लॉवर ची छोट्या देठासकट फुले वेगळी करा आणि पाण्यात एक चमचा भर मीठ घालून त्यात बुडवून ठेवा.
बटाट्याचे चौकोनी तुकडे करून वेगळ्या भांड्यात बुडवून ठेवा.
भेंडी छान धुवून , नीट पुसून शक्यतो मोठे तुकडे करून घ्या.
मध्यम आकाराच्या भेत्न्द्याचे २ तुकडे आणि मोठ्याचे जास्तीत जास्त तीन तुकडे.
आलं किसून घ्या
मिरच्या मधून उभ्या चिरा, आतल्या बिया काढून टाका आणि मग एकदम फाईन बारीक चिरून घ्या.
उभे चिरून एका बदामाचे २ पात्तळ कप करून घ्या. हे काप नंतर सध्या तव्यावर रोस्ट करायचे आहेत. पण आत्ता फक्त कप करून घ्या.
नंतर कधी काय काय करायचं ते मी पुढे सांगताच जाईन.
या काश्मिरी डिश सोबत भात जबऱ्या लागतो त्यामुळे भात आवडत असेल तर आवश्यक तेव्हढा भात तयार ठेवा. नंतर सांगतो काय काय करायचं ते मित्रांनी आणि मैत्रिणींनो.

मुख्य पाककृती....


१) पहिल्यांदा एका मिक्सर च्या भांड्यात जिरं, दालचिनी, काळी मिरी, जायफळ पूड आणि सालासकट वेलची घालून फिरवून मस्त बारीक पूड करून घ्या. पूड करून झाल्यावर लगेच खालबत्यावर झाकण ठेऊन द्या...वास उडतो या मसाल्याचा लगेच...जेवढा वास शिल्लक राहील या मसाल्यात तेव्हढी तुमची डिश भन्नाट लागण्याची खात्री जास्त जास्त...
(डिश जर भन्नाट व्हावी आणि खूप पारंपारीक व्हावी असं वाटत असेल तर या सगळ्या गोष्टी हाताने साध्या खलबत्यात कुटून घ्या...
भन्नाट चव येते डिश ला...
काश्मिरी लोक कधीच मिक्सर चा वापर करत नाही...
मी हि मिक्सर वापरत नाही...
जरा कष्ट पडतात पण डिश भन्नाट लागते...
कष्टांच काही नाही...
डिश मात्र भन्नाट लागायला हवी यार) 


२) एका जाड बुडाच्या पातेल्यात चार चमचे साजूक तूप घाला आणि मंद विस्तवावर जरा तेल तापले रे तापले कि त्वरित बारीक चिरलेली मिरची आणि आल्याचा किसलेला गोळा टाकून सतत परतत राहा...
किंचित हि वेळ आजूबाजूला पाहू नका आता मी सांगे पर्यंत...

आपण जे काही करतो आहोत त्यात काही हि जळायला नको...नाहीतर डिश वाईट लागेल...
आता विस्तवावर आणि डिश मधले साहित्य परतण्यावर नीट लक्ष द्या...
मनातल्या मनात गाणे म्हणायला हरकत नाही..रेडीओ वर ऐकू नका...लाख वळू शकते...
३-४ मिनिटे हे परतून झाल्यावर आता यात खलबत्यात कुटलेली मसाला पूड घाला, मीठ घाला आणि साखर घाला आणि परत् परतायला सुरुवात करा...
साखर आणि पाणी घातल्याने आता हे मसाला मिश्रण किंचीत्सर पाणीदार होईल....हे चांगलेच आहे...मसाला जळत नाही आणि नंतर भाज्यांनाही छान वेष्टतो मग हा पारंपारीक मसाला...
न कंटाळता हलवा मात्र हा मसाला आता कारण हा मसाला आपण कच्चा घेतला आहे सो तो व्यवस्थित शिजायला हवा.


३) आता या भांड्यात मगाशी आपण चिरून ठेवलेले बटाटे पाण्यातून उचलून तसेच्या तसे न निथळता टाकून द्या. या फोडींना जे पाणी लागून येईल तेव्हढ्या पाण्यावरच या भाज्या आपल्याला शिजवायच्या आहेत म्हणजे ग्रेव्ही व्यवस्थित राहते आणि भाजी नंतर पांचट हि होत नाही. 
आता पातेल्यातला मसाला बटाट्याला नीट परतून कोट करा हलकेच.
आता हे बटाटे आपल्याला मंद विस्तवावर साधारण दहा मिनिटे ठेवायचे आहेत झाकण ठेवून . पण साधारण पाच मिनिटांनी झाकण काढून बटाटे व्यवस्थित परतून घ्या आणि परत पुढच्या पाच मिनिटांसाठी झाकण वर ठेवून द्या.
इथे तुम्हाला मसाल्याचा मस्त ठसका लागणार आहे आणि घरच्या आणि शेजारच्यांना कळणार आहे कि तुमच्याकडे काहीतरी भन्नाट तयार होते आहे.

(आत्ता इथे ता वेळी तुम्हाला जर भात प्रचंड आवडत असेल तर आणि जर हि डिश भाता सोबत खाण्याची दैवी अनुभूती तुम्हाला अनुभवायची असेल तर बाजूला काढून ठेवलेलं तांदूळ इथे भात लावायला वापरा.
शक्यतो या डिश सोबतच भात कुकर वर लावू नका...आत्महत्या ठरेल ती...तर हा भात पातेल्यात लावा पारंपारीक पद्धतीने...मोकळा जरासा फडफडीत भात भन्नाट लागतो या काश्मिरी डिश सोबत)

४) आता ज्याप्रकारे मगाशी आपण बटाटे just निथळून घेतले तशीच भेंडी आणि फ्लॉवर हि निथळून पातेल्यात टाका आणि मस्त खालीवर परतून मसाला या सगळ्याच्या सगळ्या भाजीला लावून घ्या.
इथे या भाजीला मस्त रंगरूप आणि चव यायला सुरुवात होते.
साधारण मंद विस्तवावर हा मसाला या सगळ्या भाज्यांना नीट चोपडून २-३ मिनिटे घ्या.
आता या भांड्यात दही घाला आणि सगळ्या भाजीला मस्त खालून वर परतून हा सगळा मसाला आणि दही यांचे जबऱ्या कोटिंग द्या.
आता हे कोटिंग देवून झाले कि साधारण २-३ मिनिटे हि भजी परतत राहा.
आता या भांड्यात साधारण पाव ग्लास साधे पाणी ओत आणि मोठ्या विस्तवावर एकदा उकळी येऊ द्या.
आता हि उकळी आली रे आली कि विस्तव पुन्हा मंद करा आणि झाकण ठेवून आता हि भाजी अशीच साधारण २० मिनटे विस्तवावर ठेवून् द्या.
साधारण दहा मिनिटांनी झाकण काढा ...भाजीचा मस्त वास आत भर...फ्रेश व्हा...
भाजी एकदा वरून खाली परतून घ्या आणि पुढील अजून दहा मिनिटांसाठी झाकण ठेवून अशीच मंद विस्तवावर शिजू द्या.
आणि आता विस्तव बंद करा आणि मस्त कसुरी मेथी वर भुरभुरवा.
झाली आपली काश्मिरी-लझीझ तयार..............
मारा घरातल्या सगळ्यांना जेवायला यायची साद 

५) आता मगाशी आपण चिरून घेतलेलं बदाम कोरड्या तव्यावर रोस्ट करून घ्या.
करपवू नका पण छान कुरकुरीत रोस्ट करून घ्या.



आता वेळ महत्वाची.....प्लेटिंग ची...

मस्त रोटी सोबत प्लेटिंग करा अथवा एका छान मोकळ्या डिश मध्ये पाहिजे तितका भात घ्या आणि हि भाजी मधोमध मस्त भातावर घ्या.

या भाजीची गम्मत सांगतो.

काश्मिरी लोक हि डिश खाताना भात या भाजी सोबत कालवत नाहीत...

मस्त गरमागरम मोकळ्या आणि फडफडीत भातावर भाजी ओढून घेतात ग्रेव्ही सकट आणि न कळवताच तसाच्या तसा भाताचा आणि न्हाजीचा घास खातात...मस्तपैकी...डोळे मिटून....

तुम्ही सुद्धा या डिशचा काश्मिरी स्टेपल फूड सोबत आस्वाद घायचा असेल तर प्रत्येक भाताचा घास तसाच्या तसा आणि त्या सोबत हि गरमागरम भाजी तोंडात सरकवा...

आणि भाताच्या distinct चवी सोबत भाजीच्या चवीला तोंडातल्या तोंडात घमासान युद्ध करू द्या...
आणि या युद्धात जिंकतील ती तुमची टेस्ट बड्स...

चला तर मग...

करा लवकर...

किंचित घोटभर पाणी प्या...(जेवणा आधी आचमनाचे महत्व अधोरेखित आहे)
प्रसन्न चित्ताने भोजन मंत्र म्हणा आणि...

डिश मधल्या आपल्या आजच्या रेसिपी कडे मस्त प्रेमाने पहा, त्याचा गंध अनुभव आणि आता....

आता काय आक्रमण....

रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....

भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा



देव बरा करो.........


तुमचा (नम्र) मित्र 
मिलिंद 

  




 

Saturday, August 1, 2015

पांढऱ्या जळगावी वांग्यांचे खानदेशी भरीत




"अती परिचयात अवज्ञा" होते बहुधा आपली वांग्याच्या बाबतीत मित्रांनो आणि मैत्रिणींनो..

मधुमेह कंट्रोल मध्ये ठेवण्यास अत्यंत गुणकारी , कोलास्त्रोल वर नियंत्रित ठेवणारा आणि त्यामुळे बिपी वर हि कंट्रोल ठेवणारे वांगे, मेंदूच्या पेशींना बाह्य घटकांपासून धोका पोहोचवण्यास वांगे मदत करते, शरीरात लोहाची मात्रा योग्य प्रमाणात ठेवण्यात वांगे मदत करते, वांग्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीज कमी असतात त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास वांगे मदत करते, वांग्यांमध्ये असणाऱ्या मुबलक फायबर्स मुळे शरीरातल्या अन्न पचन करणाऱ्या रचना व्यवस्थित कार्यरत राहतात, आपल्याला कदाचित ठावूक नसेल पण वांगी आपली स्कीन छान ठेवण्यास खूप खूप मदत करतात इत्यादी इत्यादी...

आणि यापेक्षा ही सगळ्यात महत्वाचे म्हणजे वांगी ही छान आणि योग्य पद्धतीने केली तर चवीला सुद्धा  भन्नाट होतात यार.....जबऱ्या


साहित्य



साधारण - चार जणांसाठी  


पांढरी जळगावी भरीताची ताजी 
वांगी - अर्धा किलो (ही वांगी निवडताना फार मोठी वांगी घेऊ नये आणि मस्त चकचकीत आणि ताजी साधारण कडक पण हलकेच मऊ अशी निवडावीत )
मध्यम तिखट हिरव्या मिरच्या - ५/६ (आत्ता पावसाळ्याचा सिझन असल्याने मिरच्या तिखटाच असतात तेव्हा आधी मिरचीची किंचित चव घेऊन बघा आणि आवश्यकतेनुसार मिरच्या वापरा. हे भरीत झणझणीत च जबरा लागते...लेकीन पसंद अपनी अपनी)
लसुण पाकळ्या - साधारण ८/१० 
कांद्याची पात - कोवळी हिरवीगार कांद्याची पात (पात लहानशी असावी आणि कांदे जितके जास्त लहान असतील तितकी ही पात छान लागते, पात जास्त असेल तर भरीत मस्त लागते त्यामुळे आवश्यकता असेल तर दोन जुड्या घ्याव्यात)
कच्चे शेंगदाणे - एक छोटी वाटी भर (जास्त 
कच्चे शेंगदाणे मस्त लागतात आणि आवडत असतील तर नक्की जास्त वापरा जबऱ्या लागतात या भारता मध्ये दाट खाली आले मध्ये मध्ये तर -
कुठल्याही परिस्थितीत भाजलेले घेऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा...जबऱ्या लागतात  )

तेल - ५ चमचे (जरा जास्त तेल छान लागते, आपण नेहेमी जास्त तेल खात नाही त्यामुळे या डिश ला कधीतरी जास्त तेल खाल्लेत तर काही बिघडत नाही, या डिश मध्ये जास्त तेल वापरून खा,,,बाकी नंतर तेल कमी वापरा दिवसभर...वापरले नाहीत तर उत्तम )


पाककृती  


१) पहिल्यांदा मिरच्या तेलावर भाजुन , बऱ्यापैकी काळसर करून, लसुण आणि या भाजलेल्या मिरच्या असा ठेचा करुन घ्यावा.
(मिक्सर अजिबात वापरू नका यार. मी घरी असलेल्या खल-बत्यात ठेचतो हा खर्डा...जबऱ्या लागते म्हणून ही डिश...बिलीव्ह मी )


२) कांद्याची पात आधी धुवून घ्या आणि त्याला असलेला कांदा आणि पात ही मस्त बारीक चिरून घ्या.

३)आता आपली मुख्य जळगावी पांढरी वांगी मस्त धुवून घ्या.
आता या वांग्यांना प्रत्येकी ५/६ ठिकाणी टोचून आता त्याला मस्त तेलाचा एक हात फिरवून ५ मिनिटे हि वांगी तशीच उघड्यावर ठेवा...फक्त ५ मिनिटे..जास्त नाही...
आता ही वांगी थेट अग्नीवर ठेवा आणि फिरवत फिरवत भाजून घ्या.. .साल चांगली काळी पडून पाणी सुटलेले दिसेस्तोवर भाजा.
सर्व बाजुने छान खरपुस भाजल्यानंतर आता ही सगळी वांगी थोडा वेळ खाली उतरवून एका प्लेट मध्ये थंड होऊ द्या.
आता देठ काढुन भाजला गेलेला वांग्यांचा गर एका प्लेट मध्ये काढून घ्या आणि मग मस्त पैकी एकत्र करून ठेचून ठेचुन घ्या. 


४) शक्य असेल तर ही भरीताची डिश लोखंडी कढइत करा. भन्नाट लागते. घरी मातीचे भांडे असेल तर हेवन...
या आपल्या भांड्यात आता सर्व तेल टाकुन पुरेसे गरम झाल्यावर त्यात आधी शेंगदाणे टाका आणि चांगले काळे होईपर्यंत परतत परतत तळून घ्या.


५) आता या तेलात शेंगदाणे तसेच ठेवून त्यात आपण मगाशी केलेला मिरची-लसणाचा खर्डा हळुवार सोडा आणि मंद अग्नीवर परतत परतत परतून घ्या...
आता भन्नाट लजीज खाट सुटलेला आहे...
पण घाबरू नका...
डिश भन्नाट होणार आहे..
विश्वास ठेवा...
पेशंस ठेवा...


 ६) खाट सुटल्या सुटल्या यात दोन चमचे मीठ आणि एक चमचा साखर घालून मंद अग्नीवर एक मिनिटे परतून घ्या.

७) आता या मिश्रणात कांदा आणि चिरलेली कांद्याची पात सरकवा आणि मस्त परतून घ्या...
पाणी अजिबात घालू नका. 


८) आता या सगळ्यात भाजलेल्या वांग्यांचा लगदा घाला आणी हळूवार पण सतत हलवत भरीत मस्त परतुन घ्या. 

आता यावर अगदी किंचित पण मस्त चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घाला...थोडीशीच आणि आवडत असेल तर शेवटी लिंबू पिळा...
लिंबाच्या सान्निध्यात तिखटाचा स्वाद मस्त खुलतो नेहेमीच...
लक्ष्यात ठेवा.


आता वेळ आली आहे प्लेटिंग ची...

मस्त प्लेट्स घ्या...

गरमागरम सर्व्ह करा आणि मस्त फुललेल्या पोळ्यासोबत चेपा जोरदार...

नुसत्या गरमागरम भाता सोबत पण भन्नाट लागते हि दिः मित्रांनो...

फक्त भाता सोबत खाताना कदाचित किंचित मीठ अजून घ्यावे लागेल भातावर आणि यावर लिंबू पिळा...स्वर्ग...स्वर्ग...आणि निव्वळ स्वर्ग 
आणि गरमागरम पोळीसोबत मस्त जेवण सुरु करा...

अरे थांबा थांबा यार....

आचमन केलेत का ?

जेवणा पूर्वी २ घोट पाणी पिऊन घ्या...

हात जोडून देवाचे स्मरण करा...भोजन मंत्र म्हणा आणि..

आता करा सुरुवात...


रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....

भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा



देव बरा करो.........