Wednesday, July 22, 2015

स्टफ्ड बनाना

स्टफ्ड बनाना



नेहेमीची पिकलेली पिवळी मधुर केळी आपण खूप खातो, आवडीने खातो पण कच्च्या केळयांचे अतोनात फायदे मात्र याच वेळी आपण नेहमीच दुर्लक्षतो.....

रॉ हिरव्या केळ्यांमध्ये लोडेड विटामिन्स आणि मिनरल्स सोबतच असे काही स्टार्च असतात की ज्यामुळे ब्लड शुगर आणि कोलॅस्ट्रोल ही कंट्रोल मध्ये राहते असे सिद्ध झाले आहे....

आजच्या धकाधकीच्या स्ट्रेस्ड लाइफस्टाइल मध्ये अत्यावश्यक नाहीये का मग ही भाजी मित्रांनो आणि मैत्रिणींनो ?

चला तर मग बघुया हि भन्नाट पण अतिशय सोप्पी भाजी....


साहित्य 

कच्ची हिरवी केळी - मध्यम आकाराची ५ केळी
कोथिंबीर - एकदम छान बारीक चिरलेली साधारण ८ चमचे (जास्तच लागते या भाजीला)
धने पावडर - २ चमचे 
जिरं पावडर - १ चमचा 
हिंग - एक चमचाभर 
मीठ - २ चमचे 
साखर - ३ चमचे 
हळद - अर्धा चमचा 
लाल तिखट - ३ चमचे 
जिरं - दोन चमचे 
लिंबाचा रस - ४ चमचे 
बेसन - २ चमचे 
काळी मोहरी - एक चमचा 
तेल - तीन चमचे 



पाककृती 

१) हिरव्या केळ्यांचे नीट धुवून, साल तसेच ठेवून (साल काढू नका, सालच्या आत केळे छान शिजते...नंतर खाताना आपण हे साल काढून टाकू शकतो) प्रत्येकी तीन तुकडे करून घ्या आणि प्रत्येक तुकड्याला एकच उभा छेद इतपतच द्या कि केळ्याचे दोन तुकडे होणार नाहीत...(हे उभे छेद देताना सुरी साधारण हलवून नीट जागा करून घ्या म्हणजे नंतर स्टफिंग छान भारता येईल आत)




२) एका प्लेट मध्ये आता एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घ्या आणि त्यात धने आणि जिरं पावडर, लाल तिखट, मीठ, हळद, अर्धा चमचाभर हिंग, बेसन, लिंबाचा रस, एक चमचा तेल आणि साखर नीट छान मिक्स करून घ्या.
हे स्टफिंग आता असेच झाकून साधारण ५ मिनिटे तयार होण्यासाठी ठेवून द्या.





३) आता उभ्या चिरलेल्या केळ्यांच्या तुकड्यांमध्ये हे स्टफिंग एकदम नजाकतीने भरा...
जेणेकरून केळ्यांचे दोन तुकडे होणार नाहीत.





४) उरलेया स्टफिंग मध्ये आता एक चमचा भर अथवा आवश्यक असेल तितके कोमट पाणी घालून (जास्त नको) भरलेले केळ्यांचे तुकडे या पाण्यात साधारणपणे १५ मिनिटे पसरून ठेवा जेणेकरून हे पातळ स्टफिंग केळ्यांना सर्वबाजूंनी लागेल आणि केळीचे तुकडे मस्त हलके मसालेदार तयार होतील.

५) आता एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये दोन चमचा तेल तापवून घ्या आणि तेल तापल्यावर मोहोरी घाला, जिरं घाला आणि हे दोन्ही एका मागून एक तडतडले कि आता उरलेला हिंग घाला. 

६ ) आता आपण स्टफिंग भरून तयार केलेले केळ्यांचे तुकडे या भांड्यात मिश्रण खालच्या बाजूला येईल असे ठेवून द्या. हे असे ठेवल्यावर भांडयात असलेले तेल साधारण सगळ्या तुकड्यांना लागेल अश्या बेताने भांडे मागेपुढे आणि आवश्यकता वाटल्यास वरखाली हलवा...
 

केळ्याच्या तुकड्यांना आता स्पर्शू नका...
केळी तुटण्याचा अथवा स्टफिंग बाहेर निघण्याचा धोका असतो.

किंचित वाफ बाहेर जाऊ शकेल अश्या बेताने एखादे झाकण या भांड्यावर ठेवून साधारण १० मिनटे मध्यम अग्नीवर शिजू द्या.

७) दहा मिनिटांनी झाकण काढून केळ्यांचे तुकडे परत भांडे मागेपुढे आणि वरखाली हलवून पुन्हा पाच एक मिनिटे विस्तवावर ठेवून द्या...झाकण अलगद ठेवा...

आता वेळ आली आहे प्लेटिंग ची...

आम्ही तर हि डिश पारंपारीक केळीच्या पानांवर खाल्ली...

बघा...तुम्हाला काय आवडत ते 

भाजी पानात वाढून घेतल्यानंतर अलगद हातानी केळीच्या तुकड्यांची साले काढून टाका...

आणि गरमागरम पोळीसोबत मस्त जेवण सुरु करा...

अरे थांबा थांबा यार....

आचमन केलेत का ?

जेवणा पूर्वी २ घोट पाणी पिऊन घ्या...

हात जोडून देवाचे स्मरण करा...भोजन मंत्र म्हणा आणि..

आता करा सुरुवात...


रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....

भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा



देव बरा करो.........







Monday, July 20, 2015

व्हेज फ्लॉवर्स इन जर्दाळु डीप

व्हेज फ्लॉवर्स इन जर्दाळु डीप




मित्रांनो आणि मैत्रिणींनो...

हि डिश भन्नाट पौष्टिक आहे आणि दिसायला पण जबऱ्या आहे ...

हो...एक मात्र खर कि घाईघाईत आटोपायची हि डिश नाही...

निवांत रविवार अथवा सुट्टीचा दिवस असेल किंवा संध्याकाळी ऑफिस मधून लवकर आलात तर मात्र हि डिश नक्की करा आणि सगळे सोबत बसून या प्रचंड हेल्दी डिशचा मनसोक्त आस्वाद घ्या...

पौष्टिक खा...पौष्टिक खा म्हणून उद्घोष आपण नेहेमीच ऐकत असतो आणि करत हि असतो...

शेवटी पौष्टिक म्हणजे नेमकं काय हे सांगण तस अवघडच असतं...

परत पौष्टिक पदार्थ चवीला रुचकर असताच अस नाही...
आणि पौष्टिक पदार्थ दिसायला हि देखणे असतीलच अशी नाही...

पण आज आम्ही केला तो पदार्थ जबऱ्या पौष्टिक तर आहेच, स्वादिष्ट पण आहेच आणि दिसायला हि इतका आकर्षक आहे कि लहानांपासून ते थोर..
सगळेच्या सगळे लोक नक्कीच मिटक्या मारत खातील...
हा माझा शब्द मित्रांनो आणि मैत्रिणींनो...


बर ही डिश इतकी भन्नाट आहे कि मुले तर याच्या प्रेमातच पडतात ,
म्हणजे आई हा पौष्टिक पदार्थ मुलांना नक्कीच डब्ब्यात देऊ शकेल...

चला तर मग...पाहूया या भन्नाट पदार्थाची रेसिपी...

साहित्य


गाजर - मध्यम आकाराची २
कोबी - साधारण अर्धा पाव
मटार - शंभर ग्राम
बटाटे - मध्यम आकाराचे ४
दुधी भोपळा - पाव किलो
बीट - शंभर ग्राम
आलं - साधारण २ इंचाचा ताजा तुकडा
लसूण - ८ पाकळ्या
पुदिना - ३० एक पाने बारीक चिरलेली
कोथिंबीर - बारीक चिरलेली ४ चमचे
कसुरी मेथी - २ चमचे
चण्याचे पीठ - साधारण ४ चमचे लागेल...(भाज्या ताज्या आणि रसरशीत असतील तर चिरल्यावर या भाज्यांना मस्त पाणी सुटते आणि मग मिश्रण घट्ट होत नाही...गोळे छान घट्ट होवून तांदूळ धरून ठेवण्यासाठी मिश्रण बऱ्यापैकी घट्ट व्हावे लागते...जर रसामुळे मिश्रण सैलसर झाले तर साधारण आवश्यक तेव्हढे बेसन घ्या म्हणजे पीठ बऱ्यापैकी घट्ट होईल)
मीठ - ३ चमचे (चवीनुसार)
जर्दाळू - शंभर ग्राम
बेदाणे - शंभर ग्राम
मिरची - एक उभी चिरून बिया काढून टाकलेली
काळी मिरी पावडर - अर्धा चमचा
साखर - ४ चमचे
चाट मसाला - १ चमचा
गरम मसाला - २ चमचे
केळीचे पान - एक मोठे
पालक - पंधरा ते वीस कोवळी पाने

पाककृती


पहिली तयारी....

गाजर आणि  बीट  यांची साले काढून मस्त किसून घ्या,
दुधी भोपळा नीट धुवून घ्या आणि साले न काढता किसून घ्या,
मटार फ्रोझन असतील तर सध्या पाण्यात अर्धा तास बुडवून ठेवा आणि नंतर मस्त ठेचून घ्या,
बटाटे उकडून घ्या आणि साले काढून कुस्करून ठेवा,
कोबी बारीक चिरून घ्या,
आलं किसून घ्या,
लसूण ठेचून घ्या,
जर्दाळू अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर बिया काढून टाका,
बेदाणे पाण्यात पंधरा मिनिटे भिजवून ठेवा
पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या,
बासमती तांदूळ दोन तीन वेळा नीट पाणी बदलून धुवून घ्या आणि पाणी पूर्ण निथळून साधारण २० मिनिटे भांड्यात असेच ठेवा.

मुख्य पाककृती....

गाजर, बीट, दुधी , कोबी , मटार, बटाटे, आलं, लसूण, आहे तसच्या तस कुस्करून मस्त मिक्स करून घ्या, पाणी अजिबात घालू नका...
आपले शेवटचे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट असायलाच हवं.
आता या मिश्रणात पुदिना आणि कोथिंबीर मिक्स करा आणि आता जो टेम्पटिंग वास यायला लागेल तो तुम्हाला पुढे लागणाऱ्या भुकेची पहिली पायरी असेल.
आता या मिश्रणात मीठ, साखर, चाट मसाला , कसुरी मेथी  आणि गरम मसाला घालून आहे तस मिक्स करून घ्या,
हे मिक्स करता करता मिश्रणाचा धुंद गंध तुम्हाला वेड लावायला सुरुवात करेल आता,

आता आपल्याला बेसन घालायचं आहे...

बेसन हा या डिश मधला चवीचा पदार्थ नाहीये मित्रांनो आणि मैत्रिणींनो...

बेसन आपण या मिश्रणात फक्त बाइंडीग एजंट म्हणून वापरणार आहोत त्यामुळे मिश्रण जर भाज्यांच्या रसामुळे जास्त पातळ झाले असेल असेल तर बेसन थोडे जास्त घाला पण एवढेही जास्त नको कि मिश्रण पूर्ण घट्ट होईल अथवा मिश्रणाचा मूळ लाल रंग बदलेलं......
आता हि स्टेप मात्र आपण स्वतः आपल्या अनुभवाने समृद्ध करायची आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो...

मिश्रण जर पातळसर राहिले तर फ्लॉवर्स फुटतील आणि मिश्रण जर जास्तच घट्ट झाले तर डिश चा आस्वाद घेताना कडकपणा जाणवेल...
तेव्हा योग्य काळजी घ्या रे बाबांनो/बाबींनो .................

आता हे मिश्रण जरा वेळ असच ठेवून द्या...मस्त फॉर्म होण्यासाठी....झाकून



आता भिजवून बिया काढून टाकलेले जर्दाळू मिक्सर च्या लहान भांड्यात घ्या, त्यात बेदाणे घाला, काळी मिरी पावडर घाला, कमी तिखट असलेली हिरवी मिरची बिया काढून घाला, मीठ घाला , साखर घाला आणि मस्त एकजीव होईपर्यंत फिरवा...
हे झाले आपले दीप तयार...
हे डीप शक्यतो घट्टसर असू द्या...
आणि आवडत असेल तर हे डीप मस्त फ्रीज मध्ये ठेवून द्या खाली...
किंचित गार्सार डीप गरमागरम वेज फ्लॉवर्स सोबत भन्नाट लागते....
छान लागते हे मग.

आता बघूया आपली मुख्य आणि जबरदस्त रेसिपी...
व्हेज फ्लॉवर्स 


Gas वरचा स्टीमर,  इडली पात्र अथवा मोदक पात्र लागणार आहे आपल्याला यासाठी मित्रांनो आणि मैत्रिणींनो...
हे काहीच नसेल तर एक गोल मोठ्या आकाराचे भांडे आणि या मध्ये जरा जागा सोडून व्यवस्थीत बसू शकेल अश्या आकाराची चाळणी आणी या चाळणीवर नीट बसू शकेल असे झाकण.....

मी वापरला आहे Gas वरचा स्टीमर...

तर आता स्टीमरच्या खालच्या भांड्यात भांड्यात पुरेसे पाणी घ्या आणि अग्नी मोठा ठेवून मस्त उकळायला ठेवा...झाकण ठेवून

आता आपल्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोल गोळे करून घ्या,
हे गोळे आपल्या भिजवलेल्या बासमती तांदळामध्ये व्यवस्थीत घोळून घ्या...
सांभाळा......
जास्त दाबू नका...
फक्त ओले तांदूळ या गोळ्यांना व्यवस्थित सर्व बाजूंनी छान चिकटतील इतपतच घोळवा...

आणि आता स्टीमर च्या वरच्या भांड्यात खाली केळीचे ओले केलेले पान व्यवस्थित कडा भांड्याला चिकटतील अश्या तर्हेने पसरून घ्या...


आणि आता हे गोळे आपल्या स्टीमरच्या या भांड्यात एकमेकांना न चिकटता हलक्या हातांनी प्लेस करा....

सगळ्यांना मस्त शिट्टी मारून जेवणाची वर्दी द्या...
पाचच मिनिटात आपली हि भन्नाट डिश तयार होणार आहे बर का........

स्टीमर चे झाकण लावून घ्या आणि पुढचे गोळे करायला घ्या...

वरच्या काचेच्या झाकणातून तांदळाकडे पहा...

माझ्या चित्रा मध्ये दाखवले आहेत तसे हे तांदूळ आधी मस्त शिजतात आणि शिजत शिजत झक्कास फुलतात...
आणि जेव्हा हि डिश तयार होते तेव्हा शिजलेले तांदूळ फ्लॉवर्स च्या पाकळ्यांचा भन्नाट आकार घेतात...
आणि हे होतानाच आपले भाज्यांचे स्वादिष्ट मिश्रण सुद्धा मस्त व्यवस्थित शिजून निघते...

आता वेळ आली आहे भन्नाट प्लेटिंग ची...

मित्रांनो आणि मैत्रिणींनो...

आपण जे काही भन्नाट शिजवतो ते आपल्याला व्यवस्थित अंगी लागावं म्हणूनच ना ?

मग प्लेटिंग करायला आळस कश्याला...

मस्त डिनर सेट असेल तर काढा...

स्टीमर मधले गरमागरम वाफाळणारे वेज फ्लॉवर्स डिश मध्ये पालकाची पाने पसरून त्यावर सजवून घ्या.(ही पालकाची पाने नंतर जेवताना आपल्याला खावून टाकायची आहेत...मस्त फायबर्स मिळतील)
सोबत आपले भन्नाट जर्दाळू डीप घ्या...
आणि एक लक्ष्यात ठेवा...
डीप हे डीप प्रमाणे फक्त किंचित चवीपुरते बुडवून खावे...
मुख्य चव आपल्या फ्लॉवर्स ची हवी...
डीप काय  'तुका म्हणे त्यातल्या त्यात'...:) :)

किंचित घोटभर पाणी प्या...(जेवणा आधी आचमनाचे महत्व अधोरेखित आहे)
प्रसन्न चित्ताने भोजन मंत्र म्हणा आणि...

डिश मधल्या आपल्या आजच्या रेसिपी कडे मस्त प्रेमाने पहा, त्याचा गंध अनुभव आणि आता....

आता काय आक्रमण....



रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....

भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा



देव बरा करो.........


तुमचा (नम्र) मित्र 
मिलिंद 

रेसिपी - गार्गी आणि मिलिंद 
बाजारहाट आणि डिश असिस्टंट - ओम 
फ़ोटो ऍरेंजमेंट - नचिकेत
फ़ोटो - एमटिव्ही(फ्लॉवर्सवर तांदळाचे कोटिंग या स्पेसिफिक कुकिंग टाईप ची माहिती माझा मित्र विकास खन्ना याच्या सौजन्याने)












Tuesday, July 7, 2015

बटर पनीर/सोया (बटर चिकन टाईप )

बटर पनीर/सोया  (बटर चिकन टाईप )




आपण सहकुटुंब मस्तपैकी एखाद्या रेस्टॉरेंट मध्ये जातो जेवायला ,
आणि छान हॉटेल्स नॉन-वेज अणि वेज एकत्र असतात नेमकी ,
तिथे आपण वेज असतो ,
सोबतचे नॉन-वेज लोक एक जबऱ्या डिश मागवतात ,
बटर चिकन ,
डिश टेबलावर येते ,
आणि या भन्नाट पंजाबी डिशचा बेधुंद घमघमाट आपल्या घ्राणेन्द्रीयांमार्फ़त मेंदू पर्यन्त पोचतो,
आणि आपल्याला वेडं लावतो..........
पण काय करणार ?
आपण पडलो प्यूअरवेज ,
नो इश्यूज ,
आज मी करतोय ख़ास वेजीटेरियन लोकांसाठी ऑथेन्टीक पंजाबी बटर (चिकन) पनीर/सोया वेज ,
ही डिश सेम लागते बटर चिकन सारखीच,
एकदम डिक्टो....
सो , तुम्ही नॉन-वेज असाल तर यात चिकन घाला अथवा प्यूअरवेज असाल तर तुम्ही यात घाला पनीर अथवा सोया चंक्स.....
आता घरच्याघरी एन्जॉय करा भरपूर ऑथेन्टीक बटर चिकन अथवा बटर पनीर/सोया...

चला तर मग बघुया हि पंजाबी रेसिपी....

साहित्य 


म्हशीचे घट्ट दही - १०० मिलीलीटर 
तिखट पावडर - ३ चमचे (शक्यतो काश्मिरी तिखट घ्या...रंग बेफाम आकर्षक येतो आणि चव हि छान असते)  
तमालपत्र - १ चमचा चुरडलेले (किंचित गरम करून घ्या तव्यावर आणि बरं झाल्यावर हातानी चुरडा)
लवंग - १ चमचा बारीक कुटलेली 
दालचिनी - एक चमचा बारीक कुटलेली 
गरम मसाला - एक चमचा 
हिरव्या वेलची - ८ पाकळ्या 
ताज आलं - २  चमचे किसलेल
लसूण - एक चमचा ठेचलेलं
टोमाटो - अर्धा किलो लालबुंद आणि व्यवस्थीत पिकलेले   
मीठ - २ चमचे 
पनीर - अर्धा किलो 
साजूक लोणी - ६ चमचे 
कांदे - २ मध्यम बारीक चिरलेले 
कोथिंबीर - ३ चमचे बारीक चिरलेली
फ्रेश क्रीम - ४ चमचे 
लिंबू रस - ४ चमचे 
बदाम पेस्ट - ५० ग्राम 

पाककृती 

१) सर्वप्रथम मस्त ताज्या पनीरचे मध्यम आकाराचे (साधारण काडेपेटीच्या निम्म्या आकाराचे) तुकडे करून एका बावुल मध्ये घ्या.
आता यात लिंबू रस टाका, अर्धा चमचा मीठ टाका आणि २ चमचे तिखट टाका...मस्त खालीवर हलवून घ्या...
सर्व पिसेस ना कोटिंग व्यवस्थित करा आणि हा बाउल १५ मिनिटे फ्रीज मध्ये खालच्या खणात ठेवून द्या.

२) आता एका बाउल मध्ये दही घ्या...
त्यात बदाम पेस्ट, उरलेली तिखट पावडर, चुरडलेले तमालपत्र, कुटलेली लवंग आणि दालचिनी, गरम मसाला, कुटलेली वेलची , आलं आणि लसूण टाका आणि मस्त हलवा....
आता टोमाटो चे बारीक तुकडे करून मिक्सर मध्ये फिरवून घ्या आणि हि पेस्ट आता मीठ घालून या बाउल मध्ये झक्कास मिक्स करा,

३) फ्रीज मधले पनीर बाहेर काढा आणि आता या बाउल मध्ये वरचे आपण तयार केलेलं आवश्यक तेव्हढे मिश्रण घाला (पनीरच्या प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित लागेल असे...फार नको.आवश्यक तेव्हढेच....बाकीचे मिश्रण बाउल मध्येच राहू द्या )
आता एका पसरट तव्यावर तेलाचा हात फिरवून पनीरचे हे तुकडे मस्त सोनेरी रंगावर मंद अग्नीवर परतून घ्या...पनीरचा मऊपणा जावून साधारण कडकपणा यायला हवा...
बास...
फार वेळ तव्यावर ठेऊ नका...
आता या पनीरच्या अर्ध्या तुकड्यांना वर आपण केलेल्या २ नंबरची कृती केलेल्या ग्रेव्हीच्या बाउल मध्ये सोडा आणि या ग्रेव्ही मध्ये व्यवस्थित बुडवून ठेवा साधारण ५ मिनिटे.
पनीरचे अर्धे तुकडे वेगळे ठेवा.

४) एका जाड बुडाच्या भांड्यात किंवा कढइत लोणी घ्या आणि मंद अग्नीवर गरम करा...
आता या लोण्यात कांदा घालून साधारण ३-४ चमचे परतून घ्या.

५) आता या  कढइत वर तयार केलेले पनीरचे सर्व मिश्रण ओता आणि हलकेच परतत साधारण ७-८ मिनिटे मंद अग्नीवर शिजू द्या.....

६) आता यात आपण चिरलेल्या कोथिंबीरीपैकी अर्धी कोथिंबीर घालून पूर्ण खालीवर हलवून घ्या. 

७) आता आपले फ्रेश क्रीम यावर घालून व्यवस्थित परतून घ्या.

८) मगासचे बाहेर काढून ठेवलेले पनीरचे तुकडे आता यात घाला आणि आता....
आता वेळ प्लेटिंग ची..........

मस्त प्लेटिंग करा....
सोबत आडवा चीरलेला कांदा आणि लिंबू घ्या...
आवडत असेल तर तंदूर रोटी सोबत खा...
भन्नाट लागते हि डिश त्या सोबत...

भात प्रेमींसाठी सुद्धा हि डिश जबऱ्या लागते...
गरमागरम वाफाळलेल्या भातावर घ्या...........

चला तर मग करा एन्जॉय...
ही अधिक मासातली प्युअर वेज डिश मित्रांनो आणि मैत्रिणींनो......