टोमाटो पालक पुलाव
२००७ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या एनसाय्क्लोपिडीया वर मी काम करतो आहे त्यासाठी महाराजांच्या दक्षिणेतल्या तीन राज्यांत असणाऱ्या तब्बल १०० एक किल्ल्यांच्या फोटो शूट साठी मी गेलो होतो..तब्बल पूर्ण २८ दिवस
तंजावर वरून परत यायला निघालो आणि तिथे अय्यंपेट नावाच्या एका गावात एका रात्री मुक्काम केला. त्यावेळी तिथे एका तमिळ बांधवाने मला तिथला एक स्थानिक भाताचा प्रकार खाऊ घातला होता......
दिवसभर दमल्यावर खालेल्ला तो स्वादिष्ट भात म्हणजे आम्हा तिघांसाठी पर्वणीच होती...
साध्या चुलीवर अनेकानेक स्थानिक उपलब्ध पदार्थ घालून शिजवलेला तो भात इतका लजीज कसा झाला आहे असे तोडक्या मोडक्या भाषेत संवाद साधत मी त्या लुंगीत वावरणाऱ्या तमिळ बंधूला विचारलं....
त्याने तेव्हा ती जी रेसिपी मला सांगितली त्या रेसिपी मध्ये माझ्या स्वतःच्या काही गोष्टी मिसळून केलेला हा पुलाव म्हणजेच टोमाटो-पालक-पुलाव...
"अरे रोज भाज्या भाज्या काय चाललय तुझ ब्लॉग वर ? तुझ्या सारखाच् मी पण डाय-हार्ड भात-फॅन आहे...
भाताची होवून जावु दे यार एखादी सोप्पी आम्हा पुरुषांनाही जमेल अशी डिश."
माझा एक मित्र आज दुपारी मला म्हणाला...
भाताची होवून जावु दे यार एखादी सोप्पी आम्हा पुरुषांनाही जमेल अशी डिश."
माझा एक मित्र आज दुपारी मला म्हणाला...
म्हणून आत्ता करतोय ही बासमती गंधाची एक भन्नाट डिश...
"टोमॅटो-पालक -पुलाव"
मित्रांनो आणि मैत्रिणींनो...
कधी कधी एखादा दिवस तुमचाच असतो..
त्या दिवशी तुम्ही जे काही करता ते भन्नाटच होतं...
कालचा दिवस असाच होता..
काय भन्नाट झाला होता हा पुलाव...
चला तर मग..."नमनाला घडाभर तेल नको"च....
साहित्य
दिल्ली राईस - २२५ ग्राम (छान लांब टपोऱ्या दाण्यांचा जुना तांदूळ निवडा)
टोमाटो - ४ मोठे लालबुंद पिकलेले टोमाटो (३ टोमाटो धारदार सुरीने बारीक चिरलेले...एका टोमाटोचे मोठे आठ तुकडे करा )
पालक - बेबी पालक साधारण ३०/४० पाने (फार जून पालक पाने शक्यतो नको...बेबी पालक लगेच शिजतो आणि छानही लागतो, अगदीच बेबी पालक नाही मिळाला तर मोठ्या पानांचा पण किमान ताजा कोवळा पालक निवडून घ्या , पणे मधोमध चिरून घ्या आणि देठ काढून टाका )
गाजर - ३ गाजरे किसणीवर किसलेली
कांदे - २ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले
तेल - ३ चमचे (ही डिश जर लोण्यात केलीत तर सॉलिड भन्नाट लागते...मी लोण्यावर केली होती...घरच्या साजूक लोण्यात)
लसूण - ८ पाकळ्या ठेचलेल्या
जिरं पावडर - २ चमचे
धने पावडर - २ चमचे
काजू - ५० ग्राम न खारवलेले काजू
मीठ - २ चमचे
काळी मिरी पावडर - २ चमचे
पुदिना - २० पाने
हिरवी मिरची - १ बारीक उभी चिरलेली
आलं - एकदम कमी...अगदी छोटासा तुकडा ठेचलेला
साखर - एक चमचा
पाककृती
१) दिल्ली राईस वाहत्या पाण्याखाली २/३ वेळा धुवून नंतर एका मोठ्या बाउल मध्ये साध्या पाण्यात तब्बल २० मिनिटे भिजत ठेवा.
२) २० मिनिटांनंतर पूर्ण पाणी काढून टाका...
जाड बुडाचे एक मोठे भांडे घ्या...
त्यात २ चमचे मीठ टाकून हलवून हे पाणी पूर्ण उकळा....
आता त्यात आपला दिल्ली राईस घाला...
एकदा खालीवर हलवा...
आणि साधारण १० मिनिटे पर्यंत असेच मध्यम अग्नीवर ठेवा.
३) दुसऱ्या एका जाड बुडाच्या भांड्यात तेल/लोणी घ्या किंचित गरम करा आणि त्यात आलं-लसूण टाकून व्यवस्थित लाल होई पर्यंत परता.,,,,
हिरवी मिरची टाकून किंचित दाबून परता...
आता लगेच सगळा कांदा टाकून कांदा सोनेरी होईस्तोवर परता.
आता सगळे टोमाटो टाकून पुढील ५/७ मिनिटे परता....
आता यात एक चमचा साखर आणि एक चमचा मीठ टाकून परत...
आता या मिश्रणाला मस्त पाणी सुटेल.
४) आता दुसऱ्या भांड्यात आपण शिजत ठेवलेला तांदूळ त्यातील सगळे पाणी काढून टाका आणि तो सगळा तांदूळ आता या तयार मिश्रणाच्या पातेल्यात हळुवार नजाकतदार रीतीने ओता.....
आणि आता वरखाली हळुवार २/४ मिनिटे प्रेमाने अश्या रीतीने परता कि भांड्यातले सगळे मिश्रणाचे कोटिंग या तांदळाला अलगद वेश्टेल.
(आता यापुढे पूर्ण डिश होईपर्यंत या तांदळासोबत अजिबात धसमुसळे पणा करायचा नाही बर का ? तांदूळ परता म्हटलं कि हळुवार लक्षपूर्वक परतायचं आणि हलवायचा...नाहीतर हा तांदूळ मोडेल..चवीत काहीच फरक पडत नाही...चव भन्नाटच लागते फक्त प्लेटिंग आणि सौंदर्य म्हणून पण काही गोष्ट असते का नाही ?)
५) आता यात धने जिरे पावडर स्प्रीन्कला आणि वर खाली हळुवार परतून घ्या...
आता किसलेली अर्धी गाजरे यात ओता आणि परता आणि परत उरलेली किसलेली गाजरे घालून परत हलवा....
आता यात मीठ आणि काळी मिरी पावडर घालून परता....
६) आता या भांड्याला घट्ट झाकण लावून एकदम मंद अग्नीवर साधारण २० मिनिटे शिजू द्या.
७) आता झाकण काढून बेबी पालकाची अर्धी पाने या संपूर्ण भातावर अशी पसरून ठेवा कि सगळा भात झाकून जाईल...
कुठून ही दिसणार नाही...
आता भांड्याचे झाकण मुद्दामूनच अलगद भांड्यावर ठेवा...
बाजूनी वाफ जाताना दिसली पाहिजे आपल्याला...
हे असे साधारण ३/४ मिनिटे ठेवा (पूर्ण झाकण घट्ट लावाल आणि वाफ गेली नाही बाहेर तर आत पालकाला पाणी सुटेल आणि पुलावाची खिचडी होईल...काळजी घ्या)
आता झाकण काढून बघा....
वरची पालक पाने शिजल्याने मोडली गेली आहेत आणि रंग बदलून खाली फुस्स होऊन पडली आहेत....
आता ही शिजलेली पालकाची पाने हळुवार पणे भात फिरवत त्या भाताखाली जावू द्या...
आता वर आलेल्या भातावर पुदिन्याची पाने पसरा आणि आता बेबी पालकाची उरलेली अर्धी पाने या संपूर्ण भातावर पुन्हा एकदा अशी पसरून ठेवा कि सगळा भात झाकून जाईल...
कुठून ही दिसणार नाही...
आता भांड्याचे झाकण मुद्दामूनच अलगद भांड्यावर ठेवा...
साधारण ३/४ मिनिटे....
बाजूनी वाफ जाताना दिसली पाहिजे आपल्याला....
आता झाकण काढून ठेवा आणि एकदम मंद अग्नीवर हा पुलाव असाच राहू द्या...
साधारण ४/५ मिनिटे...
या वेळी पातेल्याताला खालचा भात किंचित लागतो आणि खरपूस भाजला जातो,,,
नंतर प्लेटिंग करताना हा खरपूस भात भन्नाट लागतो
८) दुसऱ्या एखाद्या भांड्यात तेल किंवा लोणी घेऊन सगळे काजू मंद अग्नीवर परतून घ्या...सोनेरी होईस्तोवर...
आणि आता हे परतलेले काजू आपल्या डिश वर पसरा...
झाली आपली डिश तयार....
मस्त प्लेटिंग करा...
सोबत आवडत असेल तर पापड आणि लोणचे घ्या...
कांद्याच्या चकत्या ही करून घ्या....
रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...
आणि ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....
आणि ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....
भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा
देव बरा करो.........
तुमचा (नम्र) मित्र
मिलिंद












