Wednesday, June 10, 2015

ड्राय-फ्रुट कुल्फी Dry-fruit Kulfi

ड्राय-फ्रुट कुल्फी 

Dry-fruit Kulfi 



आईस्क्रीम आणि कुल्फी वगैरे वगैरे ही स्पेसिफिक जातकुळी अशी आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो की यांच्यावर ताव मारायला कुठलाही सिझन सगळ्यांनाच चालतो...

माझ्या सदाशिव पेठेतल्या घराला भली मोठी टेरेस आहे...

ही मी केलेली भन्नाट कुल्फी मी बऱ्याचदा माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत , आप्त-स्वकीयान्सोबत या टेरेस शेजारच्या शेड मध्ये बसून बाहेर पाऊस धो धो कोसळताना छापलेली आहे...


तुम्ही सुद्धा हा अपरिमित आनंद उपभोगावा म्हणून मी केलेल्या ड्राय फ्रुट कुल्फीची रेसिपी खाली देत आहे..

इच्छुकांनी नक्की ही कुल्फी करून पहावी, 
मला जमली म्हणजे सर्वांनाच छान जमेल हे नक्की...

शुभेच्छा ........






साहित्य 



४ कप म्हशीचे दुध (अर्धा लिटर दुध म्हणजे साधारण तीन कप होतात)
१ कप साखर (ज्या कपातून दुध मोजणार त्याच कपातून त्याच मापाने साखर मोजा)
६ वेलदोड्यांची पावडर, 
२५ कच्चे पिस्ते (खारवलेले नाही)
१० बदाम , 
चिमुटभर केशर, 
२ स्लाईस पांढरा ब्रेड (व्हीट ब्रेड अजिबात नको...किंचित वापरतो आपण इथे हा नेहेमीचा मैद्याचा साधा व्हाईट ब्रेड...त्यामुळे हाच मैद्याचा साधा व्हाईट ब्रेड वापरावा)
१ मध्यम चमचा corn flour .

पाककृती 


१) प्रथम २ पांढरया ब्रेडच्या स्लाईसच्या जाड कडा कापून काढून टाकून द्या.
    नंतर या दोन्ही ब्रेडचे छोटे तुकडे करून मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाका.
    यामध्येच मक्याचे १ मध्यम चमचा पीठ घाला,
   आता १ कप म्हशीचे दुध घालणे आणि थोडा वेळ फिरवून याची नीट पेस्ट करून बाजूला करून ठेवा.


२) एका नेवेद्याच्या लहानश्या वाटीत २\३ चमचे गरम दुध घ्या आणि यात केशर नीट हलवून, विरघळवून केशर-दुध मिश्रण तयार करून ठेवा.

३) उरलेले तीन कप दुध आता जाड बुडाच्या अथवा नॉन स्टिक pan मध्ये घेऊन उकळायला ठेवा.
   सतत हलवत राहणे अन्यथा थोडेजरी दूध खाली लागले तरी पूर्ण कुल्फीला जळक्या दुधाचा वास आणि चव     राहील. 

   या दुधाला एक उकळी आली म्हणजे साधारण ५/७ मिनिटांनंतर मगासची आपण करून बाजूला ठेवलेली        पेस्ट यामध्ये घाला आणि पुन्हा एकदा सतत हलवत राहा.
   आता जास्त काळजीपूर्वक आणि सतत हलवा कारण आता मक्याचे पीठ खाली चिकटून लागू शकते आणि      कुल्फी बिघडू शकते.
   साधारण पूर्ण चार कप दुधाचे उकळून निम्मे म्हणजे दोन कप दुध झाले की त्यात एक कप साखर घाला.        साखर विरघळवून नंतर आता यामध्ये पिस्ते आणि बदाम बारीक तुकडे करून घालावेत. वेलदोड्याची पूड      घाला आणि विस्तव बंद करा. 


४) विस्तव बंद केल्यावर मगासचे केशर-दुधाचे तयार केलेलं मिश्रण यात नीट एकजीव करा आणि हे संपूर्ण         मिश्रण आता काचेच्या बाउल मध्ये ओतून घ्या आणि बाहेरच थंड करत ठेवा.

५) मिश्रण थंड झाल्यावर एक फूड ग्रेडचा, बाउल पूर्णपणे आणि नीट झाकला जावू शकेल असा, प्लास्टिक पेपर (चौकोनी तुकडा) घ्यावा.
   हा प्लास्टिक पेपर, ज्या काचेच्या बाउलमध्ये मिश्रण घेतले आहे, त्या काचेच्या बाउलमध्ये अश्या प्रकारे वरून अलगद दाबून बसवावा की आत जाऊन हा आतील मिश्रणाला वरच्यावर अलगद सर्व बाजूंना चिकटेल आणि या प्लास्टिक पेपरची उरलेली आतील बाजू काचेच्या बाउलला आतून चिकटून राहील.
(ही कृती नीट आणि काळजीपूर्वक करावी म्हणजे कुल्फी मध्ये बर्फ तयार होणार नाही)



असे केल्यानंतर लगेच हा बाउल फ्रीजर मध्ये ठेवावा आणि ७-८ तासानंतर बाहेर काढावा.

६) बाउल पेक्षा मोठे भांडे गरम पाणी घ्यावे आणि त्यात हा बाउल वरच्यावर बुडवावा..
यामुळे आतील कुल्फी अलगद मोकळी होऊन डिझायनर प्लेट वर अलगद काढून घेता येईल.


चला तर मग...झटपट रेसिपी आहे...मुलांच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत आणि शाळा सुरु होणार आहेत...तेव्हा मस्त मुलांना हि अत्यंत सोप्पी आणि पौष्टिक ड्राय-फ्रुट  कुल्फी करून देऊया...

आणि आपण मस्त पावसा शेजारी बसून या भन्नाट कुल्फीचा आस्वाद घेऊया....

रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  हि डिश केल्यानंतर नक्की कळवा....

भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा




देव बरा करो.........

Tuesday, June 9, 2015

बटाटा इन रेड ग्रेव्ही


बटाटा इन रेड ग्रेव्ही...
नेहेमीच्या बटाट्याला न्यारा TWIST......



मित्रांनो आणि मैत्रिणींनो  ,
नमस्कार...

आज आपण पाहणार आहोत आपल्याच घरातल्या नेहेमीच्या साथीदाराला...म्हणजेच बटाट्याला एका वेगळ्याच रूपामध्ये..

त्याचं असं आहे बघा...कि आपण कसे रोज रोज वरण-भात-भजी-आमटी-कोशिंबीर -चटणी-लोणचे खावून खावून कंटाळतो आणि मग मस्त एकदा अचानक कधीतरी पावभाजी चेपायला जातो...

तसच आहे बघा हे काहीसं...

मसाल्या डोश्यातून, काचऱ्यातून , गुळ-चिंचेच्या रस्सा भाजीतून आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वडा-पाव मधून बटाटा आपल्या आयुष्याचा स्थायीभाव होवून राहिला आहे.
आता या बटाट्याला सुद्धा कधीतरी या नेहेमीच्या रेसिपींचा कंटाळा येत असेलच ना नक्कीच...

नक्कीच........................

म्हणून आज मी ठरवलं कि जरा या बटाट्याला आज वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या मसाल्यांनी नटवूया,,,वेगळ्या पद्धतीनी याची हौस पुरवूया...



आणि मग तयार झाली हि भन्नाट डिश...

चला तर मग साहित्य बघूया या डिश साठी लागणारे...

साहित्य 



बटाटे  - ३०० ग्राम्स किंवा साधारण १२ लहान टपोरे बटाटे
धने - २ मोठे चमचे 
जिरं - २ मोठे चमचे 
लसूण पाकळ्या - ८ मध्यम आकाराच्या (सोलत बसावा लागतो म्हणून लसूण खायचा आळस करू नका...तो उग्र असला जरा तरी अत्यंत बहुगुणी आहे आपल्या जेवणात )

चिंचेचा कोळ - ५  चमचे (या बटाट्यांना रंगवायला आणि आंबट करायला नंतर टोमाटो प्युरी सुद्धा येणार आहे त्यामुळे जास्त आंबट आवडत नसेल तर चिंचेचा कोळ ४ चमचे घेऊ शकतो...पण हि भाजी आंबटच  जास्त छान लागते...म्हणजे आम्हा सगळ्यांना आवडते...तुम्ही बघा तुम्हाला काय आवडत ते तसा चिंचेचा वापर करा) 
मध्यम आकाराच्या ६ टोमाटोची प्युरी (टोमाटो गरम पाण्यात उकडून घ्या , थंड झाले कि साल काढून पाणी न घालता मिक्सर मध्ये फिरवून घ्या ) 
कडीपत्याची पाने - १० मध्यम आकाराची 
तिखट - २ चमचे (आवडत असेल आणि चालत असेल तर हे तिखट जरा जास्त तिखट पावडर घेतली तरी चालेल कारण हि भाजी जरा हायर साईड ला तिखट असली तरच जास्त छान लागते)
हिंग - चिमुटभर
तेल - ४  चमचे 
पांढरे तीळ - एक मोठा चमचा
दाणेदार साखर - १ चमचा 
मीठ - चवीनुसार...साधारण २ चमचे 


पाककृती  


सर्व बटाटे वाहत्या पाण्यात व्यवस्थित धुवून घ्या,,,आणि नंतर नीट उकडून घ्या (पूर्ण लगदा करू नये...उकडल्यावर बटाटे फर्म राहायला हवेत इतकेच उकडा, उकडून झाल्यावर एखाद्या बटाट्यात टोकदार काहीतरी काडी वगैरे घुसवून पहा...आत घुसवलेली काडी सदृश वस्तू तशीच्या तशी बाहेर आली आणि सोबत बटाट्याचा काहीच अंश बाहेर आला नाही तर समजा कि बटाटे नीट उकडले गेले आहेत.)
आता या सर्व बटाट्याची साले काढून बाजूला एका भांड्यात ठेवून द्या.

मिक्सरच्या लहान भांड्यात आता धने , जिरं आणि लसणाच्या पाकळ्या एखाद दोन वेळा फिरवून घ्या...पाणी न घालता आहेत तश्याच...आता हे मिश्रण एखाद्या वाटीत बाजूला ठेवा...



याच भांड्यामध्ये आता टोमाटोंची साले काढून हे टोमाटो एखाद दोन वेळा फिरवून प्युरी तयार करून घ्या,,,,गाळू नका...पल्प सकट प्युरी लागणार आहे आपल्याला या भाजीत.

आता पुढे.......जाड बुडाच्या भांड्यात ४ चमचे तेल घ्या आणि ते तापल्यावर त्यात चिमुटभर हिंग टाकून हलकेच परता. 

आता कडीपत्ता टाका......., पांढरे तीळ टाका........... बऱ्यापैकी परता आणि आता तिखट , साखर आणि मीठ टाका...
मस्त परता...

आता जो सुवास सुटणार आहे त्याने तुम्हाला जबऱ्या वाटायला सुरुवात झाली आहे....
पण आत्ताच घरच्या लोकांना जवळपास फिरकू देऊ नका...
खरी गम्मत त्यांना जेवणाच्या टेबलावरच घेऊ द्या...
मी तरी असेच करतो.... 

आणि लगेचच मगाशी मिक्सरमध्ये फिरवलेले मिश्रण भांड्यात ओता...

आता टोमाटो प्युरी ओता .......

आता हे संपूर्ण मिश्रण तेल बाजूला सोडेपर्यंत व्यवस्थित घट्टसर हलवा...

बाजूच्या भांड्यात ठेवलेल्या बटाट्यांना हलकेच टूथ पिक च्या सहाय्याने भोके पडून घ्या...
म्हणजे लज्जतदार मिश्रण बटाट्याच्या अगदी आत पर्यंत घुसून चव आत फिरवू अन जिरवू शकेल....

आता या लाल ग्रेव्ही तयार झालेल्या भांड्यात बटाटे बिनधास्त सोडा आणि सर्व बाजूंनी हलकेच फिरवत फिरवत सगळ्या मिश्रणाचे कोटिंग बटाट्यांना  मस्त  कवेत घेवू द्या....

ही तयार झाली आपली बटाटा इन रेड ग्रेव्ही ....

कशी झाली आहे भाजी...मस्त ना ?

ही भाजी आपण गरमागरम पोळ्या सोबत अथवा वाफाळणाऱ्या भातासोबत ही मस्तपैकी खावू शकतो...

सोबत पण मस्त उडदाचा पापड मात्र  हवा...
आणि तो पण लसूण मिश्रित......आवडत असल्यास

रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  हि डिश केल्यानंतर नक्की कळवा....


भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा



देव बरा करो.........





Monday, June 8, 2015

मसाला भेंडी...

मसाला भेंडी..........लज्जतदार भारतीय मसाल्यांनी ल्यालेली किंचितसर आंबट आणि अलगद तिखट भेंडी  

Masala Okra...Masala Bhendi

काल मी केलेल्या मसाला भेंडीची रेसिपी देत आहे..

नक्की ट्राय करा...
भेंडी आवडत नसेल तरी हि भाजी नक्की आवडेल बघा तुम्हाला..........
भेंडी या भाजीमध्ये भरपूर फायबर्स असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात...
त्यामुळे जरी तुम्हाला भेंडी आवडत नसेल तरी हि भजी अशी ट्राय करा...
दुहेरी फायद्यात असाल...
शरीराला आवश्यक घटक मिळतील आणि...
चटकदार भेंडी हि खायला मिळेल...





साहित्य

५०० ग्राम भेंडी
(भेंडी विकत घेताना शक्यतो ४ इंचापेक्षा कमी लांबीची छान ताजी, कोवळी आणि शक्यतो घट्ट भेंडी निवडावीत,
भाजीवाला ओळखीचा असेल तर (एखाद्याच भेंडीचे) टोक मोडून पाहावे, एका झटक्यात कटकन मोडणारी भेंडी उत्तम...चिवटपणे मोडता मोडली नाही तर ढुंकून ही अजिबात पाहू नका)





अर्धा चमचा हळद पावडर
दीड चमचा लाल तिखट (शक्य असेल तर संकेश्वरी आणि काश्मिरी मिरचीचे तिखट निम्मे निम्मे घ्यावे..रंग मस्त..चव छान)
१ चमचा मीठ
दीड चमचा दाणेदार साखर
पाच चमचे लिंबू रस
दीड चमचा धने पावडर
दीड चमचा जिरे पावडर
१ चमचा जिरं
१ चमचा काळी मोहरी
४ चमचे हिरवीगार फ्रेश बारीक कापलेली कोथिंबीर
एक चमचा कसुरी मेथी (किंचित कडवट चव छान लागते, आवडत नसल्यास वापरली नाही तरी चालेल)
२ चमचे तेल अथवा साजूक तूप (तुपावर केल्यास भन्नाट लागते)
४ चमचे धारदार सुरीने बारीक चिरलेले टोमाटो (धारदार सुरी घ्यावी म्हणजे चिरताना टोमाटोचा रस बाहेर येत नाही , हा रस पडून भाजी चिकट होऊ शकते )



कृती



१) बाजारातून आणलेली छान कोवळी छोटेखानी भेंडी मस्त स्वच्छ धुवून घ्या आणि पाण्याने भरलेल्या कुंड्यात ५ एक मिनिटे बुडवून ठेवा.


२) ५ मिनिटानंतर बाहेर काढून एक एक भेंडे व्यवस्थित कोरड्या टॉवेल ने पूर्ण कोरडे करून घ्या आणि बाजूला वेगळ्या कोरड्या भांड्यात ठेवा.

३) भेंडीचे देठ धारदार सुरीने कापून टाका आणि प्रत्येक भेंडीचे उभे चिरून चार तुकडे करा.
(चिरताना प्रत्येक भेंडे व्यवस्थित पाहून घ्या...भेंडीमध्ये अळ्या असण्याचा संभाव असू शकतो, एखाद्या भेन्ड्यात अळी दिसलीच तरी नाराज होऊ नका , अख्खे भेंडे फेकून द्या...आणि पुढच्या भेन्डीकडे वळा...तुम्ही ताजी भेंडी आणली आहेत बाजारातून त्यामुळे अळ्या असण्याची शक्यता फारच दुर्लभ)

४) एका काचेच्या बाउलमध्ये हळद पावडर, तिखट पावडर, धने-जिरं पावडर, बारीक कापलेली कोथिंबीर, साखर, मीठ, लिंबाचा रस सगळ नीट मिक्स करून घ्या...
यात मसाला कोरडा वाटला तरी पाणी घालू नका...
लिंबाचा रस वाढवा....
हे मिश्रण अधिक जास्त छान तयार होण्यासाठी किमान १० मिनिटे तरी झाकून ठेवून द्या.


५) जाड बुडाच्या भांड्यात तेल तापवा आणि पुरेसे तापल्यावर त्यात आधी काळी मोहरी आणि मोहरी तडतडल्यावर नंतर जिरं घाला...

६) आता यात अर्धा चमचा साखर घाला , किंचित हलवा आणि लगेच मगाशी बाजूला तयार करून ठेवलेले मसाल्यांचे मिश्रण घालून व्यवस्थित परता...
आता यात मगाशी चिरून बाजूला ठेवलेली कोरडी भेंडी घाला , हात ओला करून भेन्डीवर पाण्याचा किंचित (किंचित म्हणजे अगदी किंचित ) हबकारा मारा , झाकण ठेवा आणि मंद अग्नीवर किमान १० एक मिनिटे न परतता तसेच ठेवून द्या...

७) आता झाकण उघडून एकदा हलवा आणि कसुरी मेथी टाकून परत ३-४ मिनिटे हलवून भाजी तयार झाली असेल तर अग्नीवरून उतरवा...

८) मस्त चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेले टोमाटो घालून मस्त प्लेटिंग करा...

सोबत पापड पण मस्त लागतो...
गरमागरम पोळीसोबत अथवा भातावर घेतलेल्या मस्त आमटी सोबत ही भाजी जबरा लागते...

भरपेट खा...आरोग्यदायी रहा...खुश व्हा...मस्त जगा


देव बरा करो.........

मेथीचे स्टफ पराठे

                                    मेथीचे स्टफ पराठे

Methi Stuff Paratha




Maggi वर बंदी येत असल्याने एक जुना च परंतु अत्यांर महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा देखील प्रश्न डोके वर काढू पाहतो आहे हे नक्की.

जंक फूड का पौष्टिक फूड...

तुम्ही आई-बाबा असाल आणि तुम्ही थोडा वेळ देऊ शकत असाल तर तुमच्या पोटच्या पोरासाठी तुमचे उत्तर खचीतच पोष्टिक फूड हे असणार,

आणि मुलांच्या सुदृढ आरोग्यापुढे पालक वेळ हा बागुलबुवा नक्कीच उभा करणार नाहीत हे माझे अढळ मत आहे.

आणि खर तर या सुदृढ पौष्टिक पर्यायानंसाठी फार वेळ लागत नाही हो ...लागते फक्त इच्छाशक्ती...

आज सकाळीच शनिवार असल्याने आणि मुलांना जरा निवान्य वेळ असल्याने रोजचे पोहे , उपमा वगैरे वगैरे ब्रेकफास्ट नको म्हणून मी मेथीचे एकदम जबरऱ्या पराठे करायचे ठरवले आणि पुढच्या तासाभरात केले देखील...

मला ठाम विश्वास आहे कि तुम्हाला सुद्धा तुमच्या कुटुंबियांसाठी हि हेल्दी रेसिपी नक्कीच आवडेल...

हे स्वादिष्ट आणि पौष्टिक स्टफ पराठे सकाळी सकाळी मस्त ब्रेकफास्ट म्हणून आपण खावू शकतो अथवा डब्यामध्ये पूर्ण जेवण म्हणून सुद्धा देऊ शकतो...

सकाळी हे सगळ करायला घाई होवू शकते असं जर आजकालच्या धामधुमीच्या आयुष्यात वाटतं असेल तर यातलं सारण रात्री करून फ्रीज मध्ये ठेवू शकतो आणि कणिक सुद्धा अशीच तयार करून ठेवू शकतो...

सकाळी उठायचं...मस्त फ्रेश व्हायचं...सुर्यनारायणाच दर्शन घ्याच आणि १५ मिनिटात हा मस्त लज्जतदार आणि जबरदस्त पौष्टिक ब्रेकफास्ट तयार करायचा....

गरमागरम पराठे आणि सोबत मस्त घट्ट कवडे दही, लोणी अथवा साजूक तूप अथवा लोणचे यांसोबत इतके मस्त लागते कि कुठल्याही जंक फूड ची आठवण आपल्याला कधीच होणे शक्यच नाही. 

तेव्हा चला तर मग...

करुया मस्त मेथीचे स्टफ पराठे...

साहित्य


  • गव्हाचे पीठ  - २ कप (३००  ग्राम)
  • सोयाबीन पीठ - २ चमचे (आवडत असल्यास आणि तेही इतक्याच प्रमाणात...आणि हो सोयाबीन चे पीठ आपल्याला बाजारातून विकतच आणावे लागते...त्यामुळे हे पीठ भाजून नंतर दळलेल्या सोयाबीनचे आहे ना हे कन्फर्म करा आणि नंतरच घ्या)
  • मेथी - २५० ग्राम निवडलेली पाने
    (छान ताज्या हिरव्या लहान पानांची जुडी घ्या..निवडताना जास्त जाड/मोठ्या काड्या घेऊ नका पण छोट्या छोट्या काड्या घ्यायला काहीच अडचण नाही...उलट चांगले......शरीराला मस्त फायबर मिळते यामधून)
  • तेल - ३-४  टेबल स्पून (पराठे तव्यावर भाजताना साजूक तूप घ्यायला हरकत नाही...आम्ही गायीचे घरी लोणी कढवून तयार केलेलं तूप वापरतो...डॉक्टर ला विचारा...रोज किमान एक चमचा तूप खायला हरकत नाही...रादर...खावेच...असे डॉक्टर हल्ली नक्की सांगतात)
  • हींग - १  चिमुट 
  • हळद - अर्धा चमचा 
  • शेंगदाण्याचा कुट - २ चमचे
    (शेंगदाणे  न खाण्याचे काही पथ्य असेल तरी या मेथीच्या पराठ्यात बिनधास्त हा शेंगदाण्याचा कुट घाला...काहीही अपाय होत नाही एवढ्या सगळ्या सारणात दोन चमच्यांनी..त्याउलट शेंगदाण्यामुळे पालेभाज्या छान अंगी लागतात)
  • जीरं  - ३ चमचे  
  • हिरवी मिरची  - 2 (तुकडे करून - जास्त तिखट मिरची घेऊ नका )
  • लाल तिखट  - १/२  चमचा 
  • आले - साधारण १ इंच तुकडा (तिखट सातारी आले नको )
  • लसूण - ६ मध्यम पाकळ्या 
  • लिंबाचा रस - ३ चमचे 
  • साखर - २ चमचा 
  • मीठ  - ३/४ चमचे 
  • चिरलेली कोथिंबीर - ४ चमचे 

पाककृती

देठा सकट मेथी पाने निवडून व पाण्याने दोनदा चाळणीत  स्वच्छ धुऊन घ्या, नंतर पाणी पूर्ण निथळून  देठासकट पाने बारीक चिरून घ्या. जेवढी पाने बारीक चिराल तेव्हढी नंतर सारण भरून कणिक लाटताना सोप्पे जाते आणि पाने आणि देठ दाताखाली ही येत नाहीत. 






भांड्यामध्ये गव्हाचे पीठ, सोयाबीन पीठ , दिड चमचे मीठ आणि 2 चमचे तेल नीट मिक्स करा.
आता आवश्यक तेव्हढे किंचित कोमट पाणी घालत कणिक मळून घ्या.
हा कणकेचा मऊ गोळा आता झाकून बाजूला तयार होण्यासाठी १५ एक मिनिटे ठेवून द्या.



पीठ नीट तयार होईपर्यंत मेथी पराठ्यात घालण्याचे सारण आता तयार करून घेऊया.


मिक्सर च्या छोट्या भांड्यात चिरलेली कोथिंबीर, २ चमचे जिरे, साखर, आले, मिरचीचे तुकडे , हळद, शेंगदाण्याचा कुट , लाल तिखट , मीठ आणि थोडेसे पाणी घालून बारीकसर फिरवून घ्या. 




एका नॉन स्टिक पॅन मध्ये  २ चमचे तेल घालून तेल तापल्यावर  त्यात उरलेले जिरे घाला, साधारण परतल्यावर हिंग घाला...एक चमचा साखर घालून आता किंचित हलवून घ्या.

आता मिक्सरच्या भांड्यातले ओल्या मसाल्याचे मिश्रण 
पॅन मध्ये घाला आणि चवीनुसार मीठ घालून किंचित परतून घ्या..

आता या पॅनमधल्या मिश्रणात बारीक चिरलेली मेथी घालून व्यवस्थित परता...किंचित पाणी सुटेल...अजून परतत रहा...जास्तीचे सुटलेले पाणी पूर्ण मुरेपर्यंत परता...
आणि आता सगळ्यात शेवटी लिंबाचा मस्त ताजा ताजा रस घालून अलगद हलवा...
हा रस या सारणात घातलात रे घातलात कि या सगळ्या प्रकारचा मस्त ताजा फ्रेश वास सुटतो...
तो दीर्घ श्वास घेऊन मस्त आतपर्यंत भरून घ्या...
एक छान स्माईल द्या...स्वतःलाच
आणि आता पुढे....

लिंबाचा रस घातल्यानंतर आता गॅस लगेच म्हणजे अगदी लगेचच बंद करा आणि हे संपूर्ण सारण एका वेगळ्या प्लेट मध्ये  थंड होण्यासाठी ठेवून द्या.

एव्हाना १५ मिनिटांनी आपले पीठ सेट होवून तयार झाले आहे. हाताला थोडे तेल लावून आपले हे तयार झालेले पीठ अजून एकदा मस्त मळून घ्या...म्हणजे पराठे लाटताना अडचण येणार नाही....
तवा अग्नीवर ठेवून जरा गरम करा...

मळलेल्या पिठातून थोडेसे पीठ लढून त्याची गोळी तयार करा...तुमच्या शेजारी एका पसरत थाळीमध्ये साधे कोरडे पीठ घ्या...या गोळीला आता या कोरड्या पिठामध्ये जरासे फिरवून साधारण ३ ते ४ इंचाचा एक गोल पराठा लाटून घ्या...

या लाटलेल्या छोट्या पराठ्यावर मगासच्या थंड करत ठेवलेल्या मिश्रणातले काही २-३ चमचे मिश्रण घ्या आणि आता हाताने पराठ्याला नीट मोदकाला करतो तसे बंद करून घ्या...

आता स्टफिंग भरलेल्या गोळीला हाताच्या बोटांनी अजून थोडे दाबत दाबत मोठे करून घ्या आणि नंतर लाटण्याने साधारण ५ ते ६ इंचाचा पराठा अलगद लाटून घ्या.

तवा आतापावेतो पुरेसा तापला असल्यास त्यावर थोडेसे तेल टाकून हा लाटलेला पराठा या तव्यावर अलगद ठेवून द्या आणि उलतण्याने मस्त तांबूस होईपर्यंत शेकून तयार करा. आवडत असेल तर सारण थोडे जास्त भरायला हि हरकत नाही...जितके सारण अधिक तितके पराठे जास्त छान लागतात हे नक्की.

घरात या जबऱ्या पौष्टिक आणि गरमागरम पराठ्यांचा आस्वाद घेणारे जितके लोक असतील तितल्या प्लेट्स घ्या....
मस्त फुललेले हे पराठे आता या प्लेट्स मध्ये टोमाटो , घट्ट कवडे दही, कोथिंबीर मिरचीची चटणी अथवा लोणच्या सोबत वाढा...

आणि खाणाऱ्या लोकांनी, विशेषतः मुलांनी कौतुकाने तुमच्याकडे पाहिल्यावर मस्त मुठभर मांस अंगावर चढतं का नाही पहा...

भरपेट खा...आरोग्यदायी रहा...खुश व्हा...मस्त जगा 
देव बरा करो.........