Wednesday, July 22, 2015

स्टफ्ड बनाना

स्टफ्ड बनाना



नेहेमीची पिकलेली पिवळी मधुर केळी आपण खूप खातो, आवडीने खातो पण कच्च्या केळयांचे अतोनात फायदे मात्र याच वेळी आपण नेहमीच दुर्लक्षतो.....

रॉ हिरव्या केळ्यांमध्ये लोडेड विटामिन्स आणि मिनरल्स सोबतच असे काही स्टार्च असतात की ज्यामुळे ब्लड शुगर आणि कोलॅस्ट्रोल ही कंट्रोल मध्ये राहते असे सिद्ध झाले आहे....

आजच्या धकाधकीच्या स्ट्रेस्ड लाइफस्टाइल मध्ये अत्यावश्यक नाहीये का मग ही भाजी मित्रांनो आणि मैत्रिणींनो ?

चला तर मग बघुया हि भन्नाट पण अतिशय सोप्पी भाजी....


साहित्य 

कच्ची हिरवी केळी - मध्यम आकाराची ५ केळी
कोथिंबीर - एकदम छान बारीक चिरलेली साधारण ८ चमचे (जास्तच लागते या भाजीला)
धने पावडर - २ चमचे 
जिरं पावडर - १ चमचा 
हिंग - एक चमचाभर 
मीठ - २ चमचे 
साखर - ३ चमचे 
हळद - अर्धा चमचा 
लाल तिखट - ३ चमचे 
जिरं - दोन चमचे 
लिंबाचा रस - ४ चमचे 
बेसन - २ चमचे 
काळी मोहरी - एक चमचा 
तेल - तीन चमचे 



पाककृती 

१) हिरव्या केळ्यांचे नीट धुवून, साल तसेच ठेवून (साल काढू नका, सालच्या आत केळे छान शिजते...नंतर खाताना आपण हे साल काढून टाकू शकतो) प्रत्येकी तीन तुकडे करून घ्या आणि प्रत्येक तुकड्याला एकच उभा छेद इतपतच द्या कि केळ्याचे दोन तुकडे होणार नाहीत...(हे उभे छेद देताना सुरी साधारण हलवून नीट जागा करून घ्या म्हणजे नंतर स्टफिंग छान भारता येईल आत)




२) एका प्लेट मध्ये आता एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घ्या आणि त्यात धने आणि जिरं पावडर, लाल तिखट, मीठ, हळद, अर्धा चमचाभर हिंग, बेसन, लिंबाचा रस, एक चमचा तेल आणि साखर नीट छान मिक्स करून घ्या.
हे स्टफिंग आता असेच झाकून साधारण ५ मिनिटे तयार होण्यासाठी ठेवून द्या.





३) आता उभ्या चिरलेल्या केळ्यांच्या तुकड्यांमध्ये हे स्टफिंग एकदम नजाकतीने भरा...
जेणेकरून केळ्यांचे दोन तुकडे होणार नाहीत.





४) उरलेया स्टफिंग मध्ये आता एक चमचा भर अथवा आवश्यक असेल तितके कोमट पाणी घालून (जास्त नको) भरलेले केळ्यांचे तुकडे या पाण्यात साधारणपणे १५ मिनिटे पसरून ठेवा जेणेकरून हे पातळ स्टफिंग केळ्यांना सर्वबाजूंनी लागेल आणि केळीचे तुकडे मस्त हलके मसालेदार तयार होतील.

५) आता एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये दोन चमचा तेल तापवून घ्या आणि तेल तापल्यावर मोहोरी घाला, जिरं घाला आणि हे दोन्ही एका मागून एक तडतडले कि आता उरलेला हिंग घाला. 

६ ) आता आपण स्टफिंग भरून तयार केलेले केळ्यांचे तुकडे या भांड्यात मिश्रण खालच्या बाजूला येईल असे ठेवून द्या. हे असे ठेवल्यावर भांडयात असलेले तेल साधारण सगळ्या तुकड्यांना लागेल अश्या बेताने भांडे मागेपुढे आणि आवश्यकता वाटल्यास वरखाली हलवा...
 

केळ्याच्या तुकड्यांना आता स्पर्शू नका...
केळी तुटण्याचा अथवा स्टफिंग बाहेर निघण्याचा धोका असतो.

किंचित वाफ बाहेर जाऊ शकेल अश्या बेताने एखादे झाकण या भांड्यावर ठेवून साधारण १० मिनटे मध्यम अग्नीवर शिजू द्या.

७) दहा मिनिटांनी झाकण काढून केळ्यांचे तुकडे परत भांडे मागेपुढे आणि वरखाली हलवून पुन्हा पाच एक मिनिटे विस्तवावर ठेवून द्या...झाकण अलगद ठेवा...

आता वेळ आली आहे प्लेटिंग ची...

आम्ही तर हि डिश पारंपारीक केळीच्या पानांवर खाल्ली...

बघा...तुम्हाला काय आवडत ते 

भाजी पानात वाढून घेतल्यानंतर अलगद हातानी केळीच्या तुकड्यांची साले काढून टाका...

आणि गरमागरम पोळीसोबत मस्त जेवण सुरु करा...

अरे थांबा थांबा यार....

आचमन केलेत का ?

जेवणा पूर्वी २ घोट पाणी पिऊन घ्या...

हात जोडून देवाचे स्मरण करा...भोजन मंत्र म्हणा आणि..

आता करा सुरुवात...


रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....

भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा



देव बरा करो.........







Monday, July 20, 2015

व्हेज फ्लॉवर्स इन जर्दाळु डीप

व्हेज फ्लॉवर्स इन जर्दाळु डीप




मित्रांनो आणि मैत्रिणींनो...

हि डिश भन्नाट पौष्टिक आहे आणि दिसायला पण जबऱ्या आहे ...

हो...एक मात्र खर कि घाईघाईत आटोपायची हि डिश नाही...

निवांत रविवार अथवा सुट्टीचा दिवस असेल किंवा संध्याकाळी ऑफिस मधून लवकर आलात तर मात्र हि डिश नक्की करा आणि सगळे सोबत बसून या प्रचंड हेल्दी डिशचा मनसोक्त आस्वाद घ्या...

पौष्टिक खा...पौष्टिक खा म्हणून उद्घोष आपण नेहेमीच ऐकत असतो आणि करत हि असतो...

शेवटी पौष्टिक म्हणजे नेमकं काय हे सांगण तस अवघडच असतं...

परत पौष्टिक पदार्थ चवीला रुचकर असताच अस नाही...
आणि पौष्टिक पदार्थ दिसायला हि देखणे असतीलच अशी नाही...

पण आज आम्ही केला तो पदार्थ जबऱ्या पौष्टिक तर आहेच, स्वादिष्ट पण आहेच आणि दिसायला हि इतका आकर्षक आहे कि लहानांपासून ते थोर..
सगळेच्या सगळे लोक नक्कीच मिटक्या मारत खातील...
हा माझा शब्द मित्रांनो आणि मैत्रिणींनो...


बर ही डिश इतकी भन्नाट आहे कि मुले तर याच्या प्रेमातच पडतात ,
म्हणजे आई हा पौष्टिक पदार्थ मुलांना नक्कीच डब्ब्यात देऊ शकेल...

चला तर मग...पाहूया या भन्नाट पदार्थाची रेसिपी...

साहित्य


गाजर - मध्यम आकाराची २
कोबी - साधारण अर्धा पाव
मटार - शंभर ग्राम
बटाटे - मध्यम आकाराचे ४
दुधी भोपळा - पाव किलो
बीट - शंभर ग्राम
आलं - साधारण २ इंचाचा ताजा तुकडा
लसूण - ८ पाकळ्या
पुदिना - ३० एक पाने बारीक चिरलेली
कोथिंबीर - बारीक चिरलेली ४ चमचे
कसुरी मेथी - २ चमचे
चण्याचे पीठ - साधारण ४ चमचे लागेल...(भाज्या ताज्या आणि रसरशीत असतील तर चिरल्यावर या भाज्यांना मस्त पाणी सुटते आणि मग मिश्रण घट्ट होत नाही...गोळे छान घट्ट होवून तांदूळ धरून ठेवण्यासाठी मिश्रण बऱ्यापैकी घट्ट व्हावे लागते...जर रसामुळे मिश्रण सैलसर झाले तर साधारण आवश्यक तेव्हढे बेसन घ्या म्हणजे पीठ बऱ्यापैकी घट्ट होईल)
मीठ - ३ चमचे (चवीनुसार)
जर्दाळू - शंभर ग्राम
बेदाणे - शंभर ग्राम
मिरची - एक उभी चिरून बिया काढून टाकलेली
काळी मिरी पावडर - अर्धा चमचा
साखर - ४ चमचे
चाट मसाला - १ चमचा
गरम मसाला - २ चमचे
केळीचे पान - एक मोठे
पालक - पंधरा ते वीस कोवळी पाने

पाककृती


पहिली तयारी....

गाजर आणि  बीट  यांची साले काढून मस्त किसून घ्या,
दुधी भोपळा नीट धुवून घ्या आणि साले न काढता किसून घ्या,
मटार फ्रोझन असतील तर सध्या पाण्यात अर्धा तास बुडवून ठेवा आणि नंतर मस्त ठेचून घ्या,
बटाटे उकडून घ्या आणि साले काढून कुस्करून ठेवा,
कोबी बारीक चिरून घ्या,
आलं किसून घ्या,
लसूण ठेचून घ्या,
जर्दाळू अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर बिया काढून टाका,
बेदाणे पाण्यात पंधरा मिनिटे भिजवून ठेवा
पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या,
बासमती तांदूळ दोन तीन वेळा नीट पाणी बदलून धुवून घ्या आणि पाणी पूर्ण निथळून साधारण २० मिनिटे भांड्यात असेच ठेवा.

मुख्य पाककृती....

गाजर, बीट, दुधी , कोबी , मटार, बटाटे, आलं, लसूण, आहे तसच्या तस कुस्करून मस्त मिक्स करून घ्या, पाणी अजिबात घालू नका...
आपले शेवटचे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट असायलाच हवं.
आता या मिश्रणात पुदिना आणि कोथिंबीर मिक्स करा आणि आता जो टेम्पटिंग वास यायला लागेल तो तुम्हाला पुढे लागणाऱ्या भुकेची पहिली पायरी असेल.
आता या मिश्रणात मीठ, साखर, चाट मसाला , कसुरी मेथी  आणि गरम मसाला घालून आहे तस मिक्स करून घ्या,
हे मिक्स करता करता मिश्रणाचा धुंद गंध तुम्हाला वेड लावायला सुरुवात करेल आता,

आता आपल्याला बेसन घालायचं आहे...

बेसन हा या डिश मधला चवीचा पदार्थ नाहीये मित्रांनो आणि मैत्रिणींनो...

बेसन आपण या मिश्रणात फक्त बाइंडीग एजंट म्हणून वापरणार आहोत त्यामुळे मिश्रण जर भाज्यांच्या रसामुळे जास्त पातळ झाले असेल असेल तर बेसन थोडे जास्त घाला पण एवढेही जास्त नको कि मिश्रण पूर्ण घट्ट होईल अथवा मिश्रणाचा मूळ लाल रंग बदलेलं......
आता हि स्टेप मात्र आपण स्वतः आपल्या अनुभवाने समृद्ध करायची आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो...

मिश्रण जर पातळसर राहिले तर फ्लॉवर्स फुटतील आणि मिश्रण जर जास्तच घट्ट झाले तर डिश चा आस्वाद घेताना कडकपणा जाणवेल...
तेव्हा योग्य काळजी घ्या रे बाबांनो/बाबींनो .................

आता हे मिश्रण जरा वेळ असच ठेवून द्या...मस्त फॉर्म होण्यासाठी....झाकून



आता भिजवून बिया काढून टाकलेले जर्दाळू मिक्सर च्या लहान भांड्यात घ्या, त्यात बेदाणे घाला, काळी मिरी पावडर घाला, कमी तिखट असलेली हिरवी मिरची बिया काढून घाला, मीठ घाला , साखर घाला आणि मस्त एकजीव होईपर्यंत फिरवा...
हे झाले आपले दीप तयार...
हे डीप शक्यतो घट्टसर असू द्या...
आणि आवडत असेल तर हे डीप मस्त फ्रीज मध्ये ठेवून द्या खाली...
किंचित गार्सार डीप गरमागरम वेज फ्लॉवर्स सोबत भन्नाट लागते....
छान लागते हे मग.

आता बघूया आपली मुख्य आणि जबरदस्त रेसिपी...
व्हेज फ्लॉवर्स 


Gas वरचा स्टीमर,  इडली पात्र अथवा मोदक पात्र लागणार आहे आपल्याला यासाठी मित्रांनो आणि मैत्रिणींनो...
हे काहीच नसेल तर एक गोल मोठ्या आकाराचे भांडे आणि या मध्ये जरा जागा सोडून व्यवस्थीत बसू शकेल अश्या आकाराची चाळणी आणी या चाळणीवर नीट बसू शकेल असे झाकण.....

मी वापरला आहे Gas वरचा स्टीमर...

तर आता स्टीमरच्या खालच्या भांड्यात भांड्यात पुरेसे पाणी घ्या आणि अग्नी मोठा ठेवून मस्त उकळायला ठेवा...झाकण ठेवून

आता आपल्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोल गोळे करून घ्या,
हे गोळे आपल्या भिजवलेल्या बासमती तांदळामध्ये व्यवस्थीत घोळून घ्या...
सांभाळा......
जास्त दाबू नका...
फक्त ओले तांदूळ या गोळ्यांना व्यवस्थित सर्व बाजूंनी छान चिकटतील इतपतच घोळवा...

आणि आता स्टीमर च्या वरच्या भांड्यात खाली केळीचे ओले केलेले पान व्यवस्थित कडा भांड्याला चिकटतील अश्या तर्हेने पसरून घ्या...


आणि आता हे गोळे आपल्या स्टीमरच्या या भांड्यात एकमेकांना न चिकटता हलक्या हातांनी प्लेस करा....

सगळ्यांना मस्त शिट्टी मारून जेवणाची वर्दी द्या...
पाचच मिनिटात आपली हि भन्नाट डिश तयार होणार आहे बर का........

स्टीमर चे झाकण लावून घ्या आणि पुढचे गोळे करायला घ्या...

वरच्या काचेच्या झाकणातून तांदळाकडे पहा...

माझ्या चित्रा मध्ये दाखवले आहेत तसे हे तांदूळ आधी मस्त शिजतात आणि शिजत शिजत झक्कास फुलतात...
आणि जेव्हा हि डिश तयार होते तेव्हा शिजलेले तांदूळ फ्लॉवर्स च्या पाकळ्यांचा भन्नाट आकार घेतात...
आणि हे होतानाच आपले भाज्यांचे स्वादिष्ट मिश्रण सुद्धा मस्त व्यवस्थित शिजून निघते...

आता वेळ आली आहे भन्नाट प्लेटिंग ची...

मित्रांनो आणि मैत्रिणींनो...

आपण जे काही भन्नाट शिजवतो ते आपल्याला व्यवस्थित अंगी लागावं म्हणूनच ना ?

मग प्लेटिंग करायला आळस कश्याला...

मस्त डिनर सेट असेल तर काढा...

स्टीमर मधले गरमागरम वाफाळणारे वेज फ्लॉवर्स डिश मध्ये पालकाची पाने पसरून त्यावर सजवून घ्या.(ही पालकाची पाने नंतर जेवताना आपल्याला खावून टाकायची आहेत...मस्त फायबर्स मिळतील)
सोबत आपले भन्नाट जर्दाळू डीप घ्या...
आणि एक लक्ष्यात ठेवा...
डीप हे डीप प्रमाणे फक्त किंचित चवीपुरते बुडवून खावे...
मुख्य चव आपल्या फ्लॉवर्स ची हवी...
डीप काय  'तुका म्हणे त्यातल्या त्यात'...:) :)

किंचित घोटभर पाणी प्या...(जेवणा आधी आचमनाचे महत्व अधोरेखित आहे)
प्रसन्न चित्ताने भोजन मंत्र म्हणा आणि...

डिश मधल्या आपल्या आजच्या रेसिपी कडे मस्त प्रेमाने पहा, त्याचा गंध अनुभव आणि आता....

आता काय आक्रमण....



रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....

भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा



देव बरा करो.........


तुमचा (नम्र) मित्र 
मिलिंद 

रेसिपी - गार्गी आणि मिलिंद 
बाजारहाट आणि डिश असिस्टंट - ओम 
फ़ोटो ऍरेंजमेंट - नचिकेत
फ़ोटो - एमटिव्ही(फ्लॉवर्सवर तांदळाचे कोटिंग या स्पेसिफिक कुकिंग टाईप ची माहिती माझा मित्र विकास खन्ना याच्या सौजन्याने)












Tuesday, July 7, 2015

बटर पनीर/सोया (बटर चिकन टाईप )

बटर पनीर/सोया  (बटर चिकन टाईप )




आपण सहकुटुंब मस्तपैकी एखाद्या रेस्टॉरेंट मध्ये जातो जेवायला ,
आणि छान हॉटेल्स नॉन-वेज अणि वेज एकत्र असतात नेमकी ,
तिथे आपण वेज असतो ,
सोबतचे नॉन-वेज लोक एक जबऱ्या डिश मागवतात ,
बटर चिकन ,
डिश टेबलावर येते ,
आणि या भन्नाट पंजाबी डिशचा बेधुंद घमघमाट आपल्या घ्राणेन्द्रीयांमार्फ़त मेंदू पर्यन्त पोचतो,
आणि आपल्याला वेडं लावतो..........
पण काय करणार ?
आपण पडलो प्यूअरवेज ,
नो इश्यूज ,
आज मी करतोय ख़ास वेजीटेरियन लोकांसाठी ऑथेन्टीक पंजाबी बटर (चिकन) पनीर/सोया वेज ,
ही डिश सेम लागते बटर चिकन सारखीच,
एकदम डिक्टो....
सो , तुम्ही नॉन-वेज असाल तर यात चिकन घाला अथवा प्यूअरवेज असाल तर तुम्ही यात घाला पनीर अथवा सोया चंक्स.....
आता घरच्याघरी एन्जॉय करा भरपूर ऑथेन्टीक बटर चिकन अथवा बटर पनीर/सोया...

चला तर मग बघुया हि पंजाबी रेसिपी....

साहित्य 


म्हशीचे घट्ट दही - १०० मिलीलीटर 
तिखट पावडर - ३ चमचे (शक्यतो काश्मिरी तिखट घ्या...रंग बेफाम आकर्षक येतो आणि चव हि छान असते)  
तमालपत्र - १ चमचा चुरडलेले (किंचित गरम करून घ्या तव्यावर आणि बरं झाल्यावर हातानी चुरडा)
लवंग - १ चमचा बारीक कुटलेली 
दालचिनी - एक चमचा बारीक कुटलेली 
गरम मसाला - एक चमचा 
हिरव्या वेलची - ८ पाकळ्या 
ताज आलं - २  चमचे किसलेल
लसूण - एक चमचा ठेचलेलं
टोमाटो - अर्धा किलो लालबुंद आणि व्यवस्थीत पिकलेले   
मीठ - २ चमचे 
पनीर - अर्धा किलो 
साजूक लोणी - ६ चमचे 
कांदे - २ मध्यम बारीक चिरलेले 
कोथिंबीर - ३ चमचे बारीक चिरलेली
फ्रेश क्रीम - ४ चमचे 
लिंबू रस - ४ चमचे 
बदाम पेस्ट - ५० ग्राम 

पाककृती 

१) सर्वप्रथम मस्त ताज्या पनीरचे मध्यम आकाराचे (साधारण काडेपेटीच्या निम्म्या आकाराचे) तुकडे करून एका बावुल मध्ये घ्या.
आता यात लिंबू रस टाका, अर्धा चमचा मीठ टाका आणि २ चमचे तिखट टाका...मस्त खालीवर हलवून घ्या...
सर्व पिसेस ना कोटिंग व्यवस्थित करा आणि हा बाउल १५ मिनिटे फ्रीज मध्ये खालच्या खणात ठेवून द्या.

२) आता एका बाउल मध्ये दही घ्या...
त्यात बदाम पेस्ट, उरलेली तिखट पावडर, चुरडलेले तमालपत्र, कुटलेली लवंग आणि दालचिनी, गरम मसाला, कुटलेली वेलची , आलं आणि लसूण टाका आणि मस्त हलवा....
आता टोमाटो चे बारीक तुकडे करून मिक्सर मध्ये फिरवून घ्या आणि हि पेस्ट आता मीठ घालून या बाउल मध्ये झक्कास मिक्स करा,

३) फ्रीज मधले पनीर बाहेर काढा आणि आता या बाउल मध्ये वरचे आपण तयार केलेलं आवश्यक तेव्हढे मिश्रण घाला (पनीरच्या प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित लागेल असे...फार नको.आवश्यक तेव्हढेच....बाकीचे मिश्रण बाउल मध्येच राहू द्या )
आता एका पसरट तव्यावर तेलाचा हात फिरवून पनीरचे हे तुकडे मस्त सोनेरी रंगावर मंद अग्नीवर परतून घ्या...पनीरचा मऊपणा जावून साधारण कडकपणा यायला हवा...
बास...
फार वेळ तव्यावर ठेऊ नका...
आता या पनीरच्या अर्ध्या तुकड्यांना वर आपण केलेल्या २ नंबरची कृती केलेल्या ग्रेव्हीच्या बाउल मध्ये सोडा आणि या ग्रेव्ही मध्ये व्यवस्थित बुडवून ठेवा साधारण ५ मिनिटे.
पनीरचे अर्धे तुकडे वेगळे ठेवा.

४) एका जाड बुडाच्या भांड्यात किंवा कढइत लोणी घ्या आणि मंद अग्नीवर गरम करा...
आता या लोण्यात कांदा घालून साधारण ३-४ चमचे परतून घ्या.

५) आता या  कढइत वर तयार केलेले पनीरचे सर्व मिश्रण ओता आणि हलकेच परतत साधारण ७-८ मिनिटे मंद अग्नीवर शिजू द्या.....

६) आता यात आपण चिरलेल्या कोथिंबीरीपैकी अर्धी कोथिंबीर घालून पूर्ण खालीवर हलवून घ्या. 

७) आता आपले फ्रेश क्रीम यावर घालून व्यवस्थित परतून घ्या.

८) मगासचे बाहेर काढून ठेवलेले पनीरचे तुकडे आता यात घाला आणि आता....
आता वेळ प्लेटिंग ची..........

मस्त प्लेटिंग करा....
सोबत आडवा चीरलेला कांदा आणि लिंबू घ्या...
आवडत असेल तर तंदूर रोटी सोबत खा...
भन्नाट लागते हि डिश त्या सोबत...

भात प्रेमींसाठी सुद्धा हि डिश जबऱ्या लागते...
गरमागरम वाफाळलेल्या भातावर घ्या...........

चला तर मग करा एन्जॉय...
ही अधिक मासातली प्युअर वेज डिश मित्रांनो आणि मैत्रिणींनो...... 


Tuesday, June 30, 2015

टोमाटो पालक पुलाव

टोमाटो पालक पुलाव 



२००७ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या एनसाय्क्लोपिडीया वर मी काम करतो आहे त्यासाठी महाराजांच्या दक्षिणेतल्या तीन राज्यांत असणाऱ्या तब्बल १०० एक किल्ल्यांच्या फोटो शूट साठी मी गेलो होतो..तब्बल पूर्ण २८  दिवस

तंजावर वरून परत यायला निघालो आणि तिथे अय्यंपेट नावाच्या एका गावात एका रात्री मुक्काम केला. त्यावेळी तिथे एका तमिळ बांधवाने मला तिथला एक स्थानिक भाताचा प्रकार खाऊ घातला होता......
दिवसभर दमल्यावर खालेल्ला तो स्वादिष्ट भात म्हणजे आम्हा तिघांसाठी पर्वणीच होती...

साध्या चुलीवर अनेकानेक स्थानिक उपलब्ध पदार्थ घालून शिजवलेला तो भात इतका लजीज कसा झाला आहे असे तोडक्या मोडक्या भाषेत संवाद साधत मी त्या लुंगीत वावरणाऱ्या तमिळ बंधूला विचारलं....

त्याने तेव्हा ती जी रेसिपी मला सांगितली त्या रेसिपी मध्ये माझ्या स्वतःच्या काही गोष्टी मिसळून केलेला हा पुलाव म्हणजेच टोमाटो-पालक-पुलाव...

"अरे रोज भाज्या भाज्या काय चाललय तुझ ब्लॉग वर ? तुझ्या सारखाच् मी पण डाय-हार्ड भात-फॅन आहे...
भाताची होवून जावु दे यार एखादी सोप्पी आम्हा पुरुषांनाही जमेल अशी डिश."
माझा एक मित्र आज दुपारी मला म्हणाला...
म्हणून आत्ता करतोय ही बासमती गंधाची एक भन्नाट डिश...
"टोमॅटो-पालक -पुलाव"

मित्रांनो आणि मैत्रिणींनो...

कधी कधी एखादा दिवस तुमचाच असतो..

त्या दिवशी तुम्ही जे काही करता ते भन्नाटच होतं...

कालचा दिवस असाच होता..

काय भन्नाट झाला होता हा पुलाव...

चला तर मग..."नमनाला घडाभर तेल नको"च....

साहित्य 



दिल्ली राईस - २२५ ग्राम (छान लांब टपोऱ्या दाण्यांचा जुना तांदूळ निवडा)
टोमाटो - ४ मोठे लालबुंद पिकलेले टोमाटो (३ टोमाटो धारदार सुरीने बारीक चिरलेले...एका टोमाटोचे मोठे आठ तुकडे करा )
पालक - बेबी पालक साधारण ३०/४० पाने (फार जून पालक पाने शक्यतो नको...बेबी पालक लगेच शिजतो आणि छानही लागतो, अगदीच बेबी पालक नाही मिळाला तर मोठ्या पानांचा पण किमान ताजा कोवळा पालक निवडून घ्या , पणे मधोमध चिरून घ्या आणि देठ काढून टाका )
गाजर - ३ गाजरे किसणीवर किसलेली
कांदे - २ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले
तेल - ३ चमचे (ही डिश जर लोण्यात केलीत तर सॉलिड भन्नाट लागते...मी लोण्यावर केली होती...घरच्या साजूक लोण्यात)
लसूण - ८ पाकळ्या ठेचलेल्या
जिरं पावडर - २ चमचे
धने पावडर - २ चमचे
काजू - ५० ग्राम न खारवलेले काजू
मीठ - २ चमचे
काळी मिरी पावडर - २ चमचे
पुदिना - २० पाने
हिरवी मिरची - १ बारीक उभी चिरलेली
आलं - एकदम कमी...अगदी छोटासा तुकडा ठेचलेला
साखर - एक चमचा

पाककृती 


१) दिल्ली राईस वाहत्या पाण्याखाली २/३ वेळा धुवून नंतर एका मोठ्या बाउल मध्ये साध्या पाण्यात तब्बल २० मिनिटे भिजत ठेवा.

२) २० मिनिटांनंतर पूर्ण पाणी काढून टाका...
जाड बुडाचे एक मोठे भांडे घ्या...
त्यात २ चमचे मीठ टाकून हलवून हे पाणी पूर्ण उकळा....
आता त्यात आपला दिल्ली राईस घाला...
एकदा खालीवर हलवा...
आणि साधारण १० मिनिटे पर्यंत असेच मध्यम अग्नीवर ठेवा.

३) दुसऱ्या एका जाड बुडाच्या भांड्यात तेल/लोणी घ्या किंचित गरम करा आणि त्यात आलं-लसूण टाकून व्यवस्थित लाल होई पर्यंत परता.,,,,
हिरवी मिरची टाकून किंचित दाबून परता...
आता लगेच सगळा कांदा टाकून कांदा सोनेरी होईस्तोवर परता.
आता सगळे टोमाटो टाकून पुढील ५/७ मिनिटे परता....
आता यात एक चमचा साखर आणि एक चमचा मीठ टाकून परत...
आता या मिश्रणाला मस्त पाणी सुटेल.

४) आता दुसऱ्या भांड्यात आपण शिजत ठेवलेला तांदूळ त्यातील सगळे  पाणी काढून टाका आणि तो सगळा तांदूळ आता  या तयार मिश्रणाच्या पातेल्यात हळुवार नजाकतदार रीतीने ओता.....
आणि आता वरखाली हळुवार २/४ मिनिटे प्रेमाने अश्या रीतीने परता कि भांड्यातले सगळे मिश्रणाचे कोटिंग या तांदळाला अलगद वेश्टेल.
(आता यापुढे पूर्ण डिश होईपर्यंत या तांदळासोबत अजिबात धसमुसळे पणा करायचा नाही बर का ? तांदूळ परता म्हटलं कि हळुवार लक्षपूर्वक परतायचं आणि हलवायचा...नाहीतर हा तांदूळ मोडेल..चवीत काहीच फरक पडत नाही...चव भन्नाटच लागते फक्त प्लेटिंग आणि सौंदर्य म्हणून पण काही गोष्ट असते का नाही ?)

५) आता यात धने जिरे पावडर स्प्रीन्कला आणि वर खाली हळुवार परतून घ्या...
आता किसलेली  अर्धी गाजरे यात ओता आणि परता आणि परत उरलेली किसलेली गाजरे घालून परत हलवा....
आता यात मीठ आणि काळी मिरी पावडर घालून परता....

६) आता या भांड्याला घट्ट झाकण लावून एकदम मंद अग्नीवर साधारण २० मिनिटे शिजू द्या.

७) आता झाकण काढून बेबी पालकाची अर्धी पाने या संपूर्ण भातावर अशी पसरून ठेवा कि सगळा भात झाकून जाईल...
कुठून ही दिसणार नाही...
आता भांड्याचे झाकण मुद्दामूनच अलगद भांड्यावर ठेवा...
बाजूनी वाफ जाताना दिसली पाहिजे आपल्याला...
हे असे साधारण ३/४ मिनिटे ठेवा (पूर्ण झाकण घट्ट लावाल आणि वाफ गेली नाही बाहेर तर आत पालकाला पाणी सुटेल आणि पुलावाची खिचडी होईल...काळजी घ्या)
आता झाकण काढून बघा....
वरची पालक पाने शिजल्याने मोडली गेली आहेत आणि रंग बदलून खाली फुस्स होऊन पडली आहेत....
आता ही शिजलेली पालकाची पाने हळुवार पणे भात फिरवत त्या भाताखाली जावू द्या...
आता वर आलेल्या भातावर पुदिन्याची पाने पसरा आणि आता  बेबी पालकाची उरलेली अर्धी पाने या संपूर्ण भातावर पुन्हा एकदा अशी पसरून ठेवा कि सगळा भात झाकून जाईल...
कुठून ही दिसणार नाही...
आता भांड्याचे झाकण मुद्दामूनच अलगद भांड्यावर ठेवा...
साधारण ३/४ मिनिटे....
बाजूनी वाफ जाताना दिसली पाहिजे आपल्याला....
आता झाकण काढून ठेवा आणि एकदम मंद अग्नीवर हा पुलाव असाच राहू द्या...
साधारण ४/५ मिनिटे...
या वेळी पातेल्याताला खालचा भात किंचित लागतो आणि खरपूस भाजला जातो,,,
नंतर प्लेटिंग करताना हा खरपूस भात भन्नाट लागतो


८) दुसऱ्या एखाद्या भांड्यात तेल किंवा लोणी घेऊन सगळे काजू मंद अग्नीवर परतून घ्या...सोनेरी होईस्तोवर...
आणि आता हे परतलेले काजू आपल्या डिश वर पसरा...

झाली आपली डिश तयार....

मस्त प्लेटिंग करा...
सोबत आवडत असेल तर पापड आणि लोणचे घ्या...
कांद्याच्या चकत्या ही करून घ्या....

रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....

भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा



देव बरा करो.........


तुमचा (नम्र) मित्र 
मिलिंद 


Monday, June 29, 2015

पडवळ ट्विस्ट

 पडवळ ट्विस्ट 



खरतरं आम्ही वेर्लेकर सगळ्या भाज्या खातो...

अगदी कुठल्याही...कारलं सुद्धा...आणि पडवळ सुद्धा

पण बऱ्याच लोकांना कुणास का ठाऊक का पण पडवळ विशेष आवडत नाही..
May be...पडवळ या भाजीला स्वतःची अशी विशेष टेस्ट नाहीये...किंवा या भाजीमध्ये पाण्याचा कंटेंट तसा जास्त आढळतो म्हणून असेल...कदाचीत

पण....  पण बऱ्याच लोकांना  पडवळ विशेष आवडत नाही..हे मात्र खर 

मी हा ब्लॉग सुरु केल्यावर , माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीने मला सकाळी सकाळी फोन केला आणि म्हणाली,"अरे मित्रा, माझी मुलगी पडवळ, कारलं, दुधी भोपळा अश्या अत्यंत बहुगुणी भाज्या खाण तर दूर राहिलं या भाज्यांकडे साध ढुंकूनही पहात नाही... तुझ्या पंचतारांकीत रेसिपीज समवेत काहीतरी भन्नाट कर रे रेसिपी या आणि असल्या भाज्यांसाठी...म्हणजे तरी माझी मुलगी या भाज्या आवडीने खायला सुरुवात करेल."

मी लगेच म्हणलं, " ठीक आहे...नक्की करतो...सगळ्यांनाच याचा फायदा होईल."

आणि मग मी बरेचं प्रयत्न करून ही पडवळच्या  भाजीची रेसिपी तयार केली.
घरात सगळ्यांना खायला घातली...
अर्थातच सगळ्यांनाच ती आवडली आणि आता म्हणूनच "नावडत्या भाज्यांच्या आवडत्या सेक्शन" मध्ये आज मी पहिली भाजी सादर करतोय...
पडवळ ट्विस्ट 

साहित्य 


पडवळ - अर्धा किलो (पडवळ जितका ताजा , कोवळा आणि लुसलुशीत घ्याल तेवढी ही भाजी भन्नाट लागेल)
तेल - ४ चमचे 
जिरे - २ चमचे 
कांदापात - १२ कांदे (कांदापात घेताना एकदम कोवळी घ्या...म्हणजे कांदा अगदी लहान असतो आणि पाने पण लहान, कोवळी आणि हिरवीगार असतात...कांदापात घेतल्यावर धावत्या पाण्याखाली धुवून नंतर एकदम बारीक चिरून घ्या आणि वेगळ्या भांड्यात काढून घ्या)
टोमाटो - ५ मध्यम आकाराचे लालबुंद 
आलं - २ इंच लांब बारीक किसलेलं 
लसूण - ५ मध्यम आकाराच्या पाकळ्या ठेचलेल्या 
हिरव्या मिरच्या - ४ बारीक चिरलेल्या 
मीठ - एक चमचा 
लाल तिखट - एक चमचा 
जिरे पावडर - २ चमचे
धने पावडर - २ चमचे 
साखर - ३ चमचे 
बेसन पीठ - ४ चमचे
कोथिंबीर - २ चमचे बारीक चिरलेली
हिंग - चिमुटभर 

पाककृती 

जरा जास्त  वेळ लागला तरी हि डिश शक्यतो मंद अग्नीवर करा...जास्त छान लागते 

१) पडवळ चिरून आतल्या बिया काढून टाका आणि आपण नेहेमी करतो तश्या बारीक काचऱ्या करून घ्या. बाजूला ठेवून द्या.

२) या कृतीमध्ये नंतर आपल्याला भांड्यावर मोठे ताट ठेवून त्यावर पाणी ओतून वाफेवर ही भाजी शिजवायची आहे...तेव्हा भांड्यावर ताट व्यवस्थित बसेल असे भांडे ही भाजी करण्यासाठी निवडा....
मोठ्या जाड बुडाच्या भांड्यात २ चमचे तेल घालून , मध्यम अग्नी करून, तेल तापल्यावर त्यात चिमुटभर हिंग घाला आणि हलकेच परता...आता जिरं घालून जिरं तडतडे पर्यंत परता,

३) जिरं तडतडल्यावर अग्नी मंद करून आता पूर्ण कांदा आणि पात घालून ५/६ मिनिटे पूर्ण परतून घ्या...
कांदा पात परतून झाल्यावर पूर्ण निम्मी होईल....
आता यात हिरव्या मिरच्या घाला,,,व्यवस्थित परता....
आलं आणि लसूण ठेचा घाला आणि व्यवस्थित परता...
आणि सर्वात शेवटी टोमाटो घालून नीट परता....
(हिरव्या मिरच्या घातल्यापासून ते टोमाटो घालून परते पर्यंत सतत हे मिश्रण हलवत राहा...
अजिबात आळस नको...
हे मिश्रण जर खाली लागले अथवा करपले तर पडवळच्या या भाजीचे 'कल्याण' होईल)

३ नंबर ची ही परता परती साधारण एकंदर ६/८ मिनिटे चालते...
हे मिश्रण तयार झाल्यावर आता जरा दम घ्या...आणि या मिश्रणाचा वास घ्या...काय जबरा येतो आहे ना वास...

४) आता या मिश्रणात मीठ घालून परता...
आता यात धने-जिरे पावडर, लाल तिखट आणि सर्व साखर घाला आणि अजून किमान ३/४ मिनिटे परता.
आता हे मिश्रण साधारण सरसरीत होईल...
आता यात चिरलेला पडवळ घालून हे मिश्रण या पडवळला सगळीकडून नीट लागेल असे व्यवस्थित परतून घ्या.
 ५) आता या भांड्यावर भांडे व्यवस्थीत झाकले जाईल असे ताट ठेवा , या ताटात सर्व कडा व्यवस्थित भरतील येव्हढेच साधे पाणी ओता...आणि अग्नी मंद आहे ना हे चेक करून हे मिश्रण असेच साधारण ५ मिनिटे अग्नीवर न हलवता ठेवा.

६) आता ताट चिमट्याने अलगद बाजूला उतरवून ठेवून आतली भाजी पुन्हा एकदा व्यवस्थीत हलवून घ्या...आणि मगास सारखेच पुन्हा तेच गरम पाणी असलेले ताट भांड्यावर ठेवा...अजून ४/५ मिनिटांसाठी 

७) आता ताट बाजूला काढून भाजी शिजली आहे ना हे एक पडवळाचा तुकडा खावून बघा आणि आता भाजी शिजली असेल तर एक चमचा बेसन कोरड्या चमच्याने सर्व भाजी वर भुरभुरवा...भाजी खाली वर नीट परतून घ्या...२ मिनिटे थांबा......पुन्हा एक चमचा बेसन सर्व भाजी वर भुरभुरवा...भाजी खाली वर नीट परतून घ्या...२ मिनिटे थांबा...आणि आता पुन्हा एकदा सर्व उरलेले बेसन भुरभुरवा...आणि भाजी पुन्हा एकदा खाली वर नीट हलवून घ्या...

८) आता ही भाजी तयार झाली आहे फक्त मंद अग्नीवर ही भाजी आता अशीच अजून साधारण ३/४ मिनिटे राहू द्या....

घरातल्या ज्या ज्या मेंबर्स ना पडवळ आवडत नाही त्यांना लगेच टेबलावर बोलवा...मस्त ताटे वाढा आणि भोजन मंत्र म्हणून जेवायला सुरुवात करा...गरमागरम आणि थेट अग्नीवरून ताटात

फक्त ही भजी अग्नीवरून उतरवून थेट ताटात गेली पाहिजे...जशी जशी ही भाजी थंड होत जाईल तसे या भाजीतले आपल्या मिश्रणाचे तयार झालेले नैसर्गिक ज्युसेस नष्ट पावू लागतील हे ध्यानात ठेवा...

एक विनंती...
ही भाजी डब्यात घेवून जावू नका...
गरमागरमच छान लागते...
आणि टीव्ही पाहात पाहात ही भाजी खावू नका...
एक घास घेतल्यावर जो काही स्वाद हि भाजी तोंडामध्ये तयार करते त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर टीव्ही बंद करा...
आणि आता सावकाश जेवा......

वेडे व्हा..वेडे करा
खुप खा...खूप जगा   

रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....

भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा



देव बरा करो.........



Friday, June 26, 2015

स्टफ वांगी

स्टफ वांगी 

Stuff Brinjal




मी एक भन्नाट भात'प्रेमी आहे आणि याचा मला रास्त अभिमान आहे...
कितीही आणि कसे ही वजन वाढले तरी माझ्या या भात'प्रेमाचा पाईक होण्याचा मी निष्ठेने प्रयत्न करेन अशी जाहीर प्रतिज्ञा आज मी घेतो आहे....

हा हा हा हा ...

विनोदाचा भात...sorry sorry ...विनोदाचा भाग वेगळा...

आजची ही डिश भन्नाट युरोपिअन डिश आहे...
"रीसोटा" या इटालियन खाद्य प्रकारामध्ये ही डिश प्लेटिंग मध्ये साईड डिश म्हणून वापरली जाते...



आपण ही डिश मेन डिश म्हणून वापरूया...
थोडी किचकट आहे खरी...
पण अगदी थोडी किचकट...

पण...
शेवटी काय...
"धीर धरा रे धीरापोटी फळे रसाळ गोमटी..."

चला तर मग...एका भन्नाट डिश कडे वळूया मित्रांनो आणि मैत्रिणींनो...

स्टफ वांगी 


चार जणांसाठी साहित्य 



लहान/मध्यम आकाराची वांगी - १६
चिंचेचा कोळ (जास्त घट्ट नाही...चिंचेचे पाणी म्हणूया ...) -
८  चमचे (बाजारात मिळणारी घट्ट पेस्ट साधारण ३ चमचे घेऊन त्यात गरम पाणी घालून सुद्धा ही चिंच करता येईल)
तेल - ४ चमचे (मोहोरीचे तेल असेल तर भन्नाट लागते ही डिश...अन्यथा दुसरे कुठलेही चालते...कारण चिंच आणि तिखटाचे स्वाद मोहोरी जास्त छान खुलवते )  
कांदे - मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून
आले - ४ चमचे ताजे छान किसलेले आले
लसूण - ८ मोठ्या पाकळ्यांची  पेस्ट
धने - २ चमचे
जिरे - २ चमचे
पांढरी खसखस - ४ चमचे
पांढरे तीळ - ४ चमचे
नारळ - ४ चमचे ताजा खवलेल्या नारळाचा कीस
शेंगदाण्याचा कुट - चांगल्या भाजलेल्या शेंगदाण्याचा ५  चमचे  साधारण जाडसर कुट
लाल तिखट - १ चमचा
मीठ - ३ चमचे
कडीपत्ता - १५ पाने
सुक्या लाल मिरच्या - ५  उभ्या चिरलेल्या (शक्यतो काश्मिरी घ्या...रंग बेफाम सुंदर येतो)
कोथिंबीर - ४ चमचे बारीक चिरलेली
हिंग - चिमुटभर
साखर -  दीड चमचा

पाककृती 


१) आपण आणलेली वांगी आधी वाहत्या पाण्याखाली मस्त धुवून घ्या आणि एका भांड्यात नीट रचा...
कसली भन्नाट तुकतुकीत दिसतात ही वांगी बघा...आणि मस्त खुश व्हा...थोड्याच वेळात ही वांगी तुम्हाला जबऱ्या आनंद देणार आहेत....

२) आता या वांग्यांना धारदार सुरीने उभे क्रॉस दोन  छेद द्या...
अगदी खालपर्यंत छेद नेऊ नका नाहीतर नंतर भरल्यावर स्टफिंग निसटून जाईल...
आता ही वांगी किंचित गरम पाणी करून त्यात २ चमचे मीठ घालून त्यात पूर्ण बुडवून ठेवा ...तब्बल २० मिनिटे

३) दोन चमचे तेल जाड बुडाच्या भांड्यात तापवा आणि तापल्यावर  त्यात हिंग टाकून हलकेच परतून घ्या...
आता त्यात सगळा कांदा टाकून मंद अग्नीवर कांदा सोनेरी होईस्तोवर परतून घ्या. आता आलं आणि लसूण टाकून हलक्या हातांनी साधारण एक-दीड मिनिट परतून घ्या.

४) आता यात धने आणि जिरे घालून दोन मिनिटे व्यवस्थीत परता.
आता खसखस तीळ आणि खवलेला नारळ घालून खसखस छान लाल होईस्तोवर परता...
हे परतत असतानाच अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा साखर घालून परता...

सतत.... न थांबता परतत राहा...
खसखस घातल्यामुळे हे मिश्रण खाली चिकटू शकते...
म्हणून न थांबता परतत रहा....साधारण २ मिनिटे
साखर आणि मीठ घालून परतल्यावर पाणी सुटेल...
सुटायला हवे...
हे पाणी सुटायलाच हवे नाहीतर आधी घातलेले जिन्नस खाली चिकटतील आणि करपतील...
हे टाळण्यासाठी वाटल्यास अजून अर्धा चमचा साखर घाला...मीठ वाढवू नका...


आता हे मिश्रण थंड करत ठेवा...
आणि थंड झाल्यावर साधारण १० चमचे गरम पाणी घालून मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्या...
ही पेस्ट साधारण घट्ट व्हायला हवी...
वांग्यांच्या आत भारता येण्यायेवढी...

५) आता मिक्सर मधून काढलेली पेस्ट एका प्लेट मध्ये घ्या आणि त्यात शेंगदाण्याचा कुट , लाल तिखट पावडर, मीठ आणि ३ चमचे चिंचेचा कोळ घालून मस्त हलक्या हातांनी मिक्स करून घ्या...हे तयार झाले आपले स्टफिंग



६) आता वांगी पाण्याबाहेर काढून कोरडी करून घ्या आणि मगाशी आपण ज्या चिरा दिल्या आहेत त्यामध्ये हे स्टफिंग हळुवार हातांनी दाबून भरून घ्या....

७) उरलेले तेल मगासच्याच भांड्यात घालून मंद अग्नीवर तापू द्या आणि तापल्यावर त्यात आधी धुतलेली कडीपत्याची पाने घाला...एक दोन वेळा परता आणि आता उभ्या चिरलेल्या लाल मिरच्या यात घालून मस्त परतून घ्यायला सुरुवात करा...
लाल मिरच्या काळसर होईस्तोवर परतत रहा...पण मंद अग्नीवर...अजिबात अग्नी वाढवू नका...अन्यथा मिरच्या काळ्या होतील पण या मिरच्यांचा तिखट स्वादाचा अंश तेलात उतरणार नाही

८) आता यात  मिरच्या काळसर झाल्यावर उरलेला चिंचेचा कोळ आणि  उरलेले स्टफिंग टाकून जरा व्यवस्थित परतून घ्या...
आणि सर्वात शेवटी आता या भांड्यात आपण भरलेली वांगी हलक्या हातानी, पूर्ण भांड व्यापेल अशी पसरून ठेवा...
भांड्यावर झाकण ठेवा...
मंद अग्नीवर साधारण १५/२० मिनिटे वांगी शिजू द्या...
आता झाकण काढून भांड्यातल मिश्रण हलक्या हातांनी वान्ग्यांवर मस्तपैकी फिरवा...

आणि आता पुन्हा ही वांगी फक्त ५ मिनिटे अग्नीवर ठेवा...

कोथिंबीर स्प्रिन्कला...

झाली आपली "स्टफ वांगी" तयार.....

मस्त प्लेटिंग करा...

गरमागरम वाफाळलेला मोकळा भात प्लेट मध्ये घ्या...मधोमध
त्यावर ही वांगी, भांड्यात खाली प्रोसेस झालेल्या स्टफिंग सोबत, भातावर हलकेच प्लेस करा...
सोबत कांद्याच्या गोल चकत्या, आवडत असेल तर टोमाटो आणि लिंबू घ्या...

घरातल्या सगळ्यांना बोलवा...

घोटभर पाणी प्या...
मस्त छान सुवासांच्या सान्निध्यात प्रसन्न चित्ताने भोजन मंत्र म्हणा...
आणि आता...

आक्रमण.................

आवडत असेल तर वांग्यांवर मस्त लिंबू पिळा थोडासा...
चमच्याच्या सहाय्याने स्टफिंग सकट वांग्याचा एक तुकडा तोडा...त्या सोबत गरमागरम भात त्या सोबत घ्या आणि मस्त हा घास तोंडात सरकवा...डोळे मिता...दोन छार वेळा चावल्यावर...कसं वाटतंय ?

भन्नाट ना ?

एन्जॉय करा......

एक विनंती...
ही भाजी डब्यात घेवून जावू नका...
गरमागरमच छान लागते...
आणि टीव्ही पाहात पाहात हि भाजी खावू नका...
एक घास घेतल्यावर जो काही स्वाद हि भाजी तोंडामध्ये तयार करते त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर टीव्ही बंद करा...
आणि आता सावकाश जेवा......

वेडे व्हा..वेडे करा
खुप खा...खूप जगा   

रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....

भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा



देव बरा करो.........












Thursday, June 25, 2015

कलर्ड ड्राय स्पाईस

"कलर्ड ड्राय स्पाईस" 



फ्लॉवर म्हटलं कि आपल्याला आठवते बहुतकरून फ्लॉवर बटाटा रस्सा किंवा कुर्मा...

अर्थात...आपल्या स्वयंपाकघरातला परंपरागत फ्लॉवर बटाटा रस्सा हा मस्त गरमागरम पोळी सोबत अथवा वाफाळलेल्या भातावर लोणच् आणि पापडासोबत काय किलिंग लागतो हे सांगणे नलगे....


पण फ्लॉवर या अत्यंत बहुगुणी भाजीच्या सहाय्याने एक अत्यंत वेगवान तरीही लज्जतदार आणि पौष्टिक डिश तयार केली आहे मी....
आणि या डिशची पौष्टिकता अजून वाढवण्यासाठी मी फ्लॉवरसोबत या डिश मध्ये घातलं आहे गाजर आणि मटार...

हि भाजी तशी बऱ्यापैकी कोरडी होते...
पण मसाल्यांच्या मुक्त संचाराने सणसणीत लागते......


चला तर मग या जबऱ्या लज्जतदार, करायला अत्यंत वेगवान आणि तरीही भन्नाट पौष्टिक डिश करायला सुरुवात करूया मित्रांनो आणि मैत्रिणींनो............


साहित्य 



फ्लॉवर - अर्धा किलो (छान ताज्या पांढऱ्या रंगाचा आणि सध्या नजरेला सुद्धा सगळी फुले नीट छान मोकळी दिसतील असा फ्लॉवर निवडा...फ्लॉवर ताजा नसेल तर फ्लॉवर ची फुले मलूल होतात आणि क्रिस्प दिसत नाहीत)
गाजर - ३ मध्यम आकाराची (गाजरे फार मोठी घेऊ नका, जून असतात, मध्यम आकाराची छान लालबुंद ताजी गाजरे घ्या)
मटार - १०० ग्राम (पूर्ण वर्षभर ताजे मटार मिळणार नाहीत सो फ्रोझन चालतील)
तेल - ३ चमचे 
तमालपत्र - २ मध्यम आकाराची 
लवंग - ८ 
दालचिनी - एक इंची तुकडा 
वेलची - ६ 
काळी मिरी - १० 
लिंबू रस - ४ चमचे 
पांढरे तीळ - २ चमचे 
सुकी लाल मिरची - २ मध्यम आकाराच्या 
कसुरी मेथी - एक चमचा 
हिंग - चिमुटभर 
मीठ - २ चमचे 
साखर - चिमुटभर 
कोथिंबीर - २ चमचे बारीक चिरलेली 


पाककृती 


या डिशची आधी जरा तयारी करून घ्यावी लागते, जरा पेशंस ठेवून भाज्या नीट छान चिरल्या तर दिसतात हि छान आणि छान दिसल्यामुळे भूक हि भडकवतात छान...

१) गाजराचे उभे साधारण एक इंचाचे तुकडे करून घ्या.
 फ्लॉवरची सुद्धा मध्यम आकाराची फुले वेग-वेगळी करून घ्या आणि लगेच सगळी फुले पूर्ण पाण्यात बुडतील अश्या खोलगट भांड्यात घेवून त्यात चांगले २ चमचे मीठ टाकून पाण्यात नीट विरघळवून घ्या. असा हा फ्लॉवर चांगला २० मिनिटे तरी ठेवून द्या.(फ्लॉवर मध्ये कीड असण्याचा संभाव असतो. मिठ्याच्या पाण्याने कीड निघून जाते)
फ्रोझन मटार सध्या पाण्यात बुडवून ठेवा...
१० मिनिटांत नॉर्मल होतात 


२) एका जड बुडाच्या पातेल्यात ३ चमचे तेल घ्या आणि ते तापल्यावर त्यात हिंग टाकून हलके परतून घ्या. आता अग्नी कमी करून यात आधी लाल मिरची तुकडे करून घाला आणि मिरची काळी पडल्यावर पांढरे तीळ घालून व्यवस्थित परतून फुलू द्या. तीळ साधारण सोनेरी रंगाचे होऊ लागल्यावर आता यात तमालपत्र, दालचिनी तुकडे करून घाला आणि वेलची फोडून घाला. आता लवंग, काळी मिरी घाला आणि व्यवस्थित परतून घ्या. 
मसाल्याचे पदार्थ साधारण एक मिनिटभर परता...
जास्त नको...
वास निघून जातो....

हे मिश्रण साधारण कोरडे होताना दिसते आता लगेच यात मीठ आणि साखर घालून साधारण पाणी सुटून मिश्रण ओले होईपर्यंत परता...


३) आता यात आधी गाजरे टाकून चांगली ५ मिनिटे परतून घ्या...
आता यात फ्लॉवर ची सगळी फुले टाकून मस्त ५ मिनिटे परतून घ्या...
मसाला तयार झालेले तेल या सगळ्या भाजीला लागले पाहिजे...
सगळ्यात शेवटी मटार टाका आणि आता पुन्हा ३/४ मिनिटे परतून घ्या.
बास...
जास्त परतू नका...
या तिन्ही भाज्या आपण कच्याही खावू शकतो त्यामुळे या भाज्यांचा जबरदस्त क्रंचीपणा नष्टवायचा नसेल तर येवढीच शिजवा हि भाजी..............


४) आता यात लिंबाचा रस घाला आणि पुन्हा परतून घ्या...
लिंबू रस भाजीच्या काना-कोपऱ्यात छान लागू दे...
आता कसुरी मेथी घाला आणि पुन्हा वरून खाली आणि खालून वर हलवून घ्या....
आणि सगळ्यात शेवटी आता चिरलेली कोथिंबीर वर स्प्रीन्कला...


आता वेळ आली आहे भन्नाट प्लेटिंग ची 

मित्रांनो आणि मैत्रिणींनो...
जे अन्न आपण तयार करतो ते छान प्लेटिंग करणे खूप आवश्यक असते कारण हे छान सजवलेले अन्न आपल्या पोटात भुकेचा आगडोंब उसळवते आणि 'मग आणि मगच' हे अन्न आपल्याला छान पचते ज्याला आपण आपल्या भाषेत 'अंगाला लागते' असे म्हणतो....

चला...तर मग ...हाक मारा घरच्यांना...
अर्थात मसाल्यांच्या वासांनी आत्तापावेतो त्यांना कल्पना आलीच असेल की..."काहीतरी जबऱ्या शिजतंय..."

मस्त ही प्लेट टेबलाच्या मध्यभागी ठेवा...
ताटात  गरमागरम पोळ्या घ्या...
अथवा वाफाळलेला भात घ्या...
वर ही भाजी घ्या...

ही भाजी खाताना मध्ये मध्ये मसाल्याचे पदार्थ येतील दातांखाली...
माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे कि किमान 'थोडे' तरी हे मसाल्याचे पदार्थ या डिश सोबत खा...
हे पदार्थ फक्त वासांसाठी आणि केवळ चवीसाठी नसतात तर या प्रत्येक मसाल्याच्या पदार्थाचे काही ना काही फायदे शरीराला नक्की होत असतात...


चला तर मग...
ताट वाढले आहे...
एक घोट पाणी पिऊन घ्या...
आपला नेहेमीचा भोजन मंत्र म्हणा...
आणि होऊ द्या सुरु.....आक्रमण

एक विनंती...
हि भाजी डब्यात घेवून जावू नका...
गरमागरमच छान लागते...
आणि टीव्ही पाहात पाहात हि भाजी खावू नका...
एक घास घेतल्यावर जो काही स्वाद हि भाजी तोंडामध्ये तयार करते त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर टीव्ही बंद करा...
आणि आता सावकाश जेवा......
वेडे व्हा..वेडे करा
खुप खा...खूप जगा   

रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  हि डिश केल्यानंतर नक्की कळवा....

भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा



देव बरा करो.........