Friday, June 26, 2015

स्टफ वांगी

स्टफ वांगी 

Stuff Brinjal




मी एक भन्नाट भात'प्रेमी आहे आणि याचा मला रास्त अभिमान आहे...
कितीही आणि कसे ही वजन वाढले तरी माझ्या या भात'प्रेमाचा पाईक होण्याचा मी निष्ठेने प्रयत्न करेन अशी जाहीर प्रतिज्ञा आज मी घेतो आहे....

हा हा हा हा ...

विनोदाचा भात...sorry sorry ...विनोदाचा भाग वेगळा...

आजची ही डिश भन्नाट युरोपिअन डिश आहे...
"रीसोटा" या इटालियन खाद्य प्रकारामध्ये ही डिश प्लेटिंग मध्ये साईड डिश म्हणून वापरली जाते...



आपण ही डिश मेन डिश म्हणून वापरूया...
थोडी किचकट आहे खरी...
पण अगदी थोडी किचकट...

पण...
शेवटी काय...
"धीर धरा रे धीरापोटी फळे रसाळ गोमटी..."

चला तर मग...एका भन्नाट डिश कडे वळूया मित्रांनो आणि मैत्रिणींनो...

स्टफ वांगी 


चार जणांसाठी साहित्य 



लहान/मध्यम आकाराची वांगी - १६
चिंचेचा कोळ (जास्त घट्ट नाही...चिंचेचे पाणी म्हणूया ...) -
८  चमचे (बाजारात मिळणारी घट्ट पेस्ट साधारण ३ चमचे घेऊन त्यात गरम पाणी घालून सुद्धा ही चिंच करता येईल)
तेल - ४ चमचे (मोहोरीचे तेल असेल तर भन्नाट लागते ही डिश...अन्यथा दुसरे कुठलेही चालते...कारण चिंच आणि तिखटाचे स्वाद मोहोरी जास्त छान खुलवते )  
कांदे - मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून
आले - ४ चमचे ताजे छान किसलेले आले
लसूण - ८ मोठ्या पाकळ्यांची  पेस्ट
धने - २ चमचे
जिरे - २ चमचे
पांढरी खसखस - ४ चमचे
पांढरे तीळ - ४ चमचे
नारळ - ४ चमचे ताजा खवलेल्या नारळाचा कीस
शेंगदाण्याचा कुट - चांगल्या भाजलेल्या शेंगदाण्याचा ५  चमचे  साधारण जाडसर कुट
लाल तिखट - १ चमचा
मीठ - ३ चमचे
कडीपत्ता - १५ पाने
सुक्या लाल मिरच्या - ५  उभ्या चिरलेल्या (शक्यतो काश्मिरी घ्या...रंग बेफाम सुंदर येतो)
कोथिंबीर - ४ चमचे बारीक चिरलेली
हिंग - चिमुटभर
साखर -  दीड चमचा

पाककृती 


१) आपण आणलेली वांगी आधी वाहत्या पाण्याखाली मस्त धुवून घ्या आणि एका भांड्यात नीट रचा...
कसली भन्नाट तुकतुकीत दिसतात ही वांगी बघा...आणि मस्त खुश व्हा...थोड्याच वेळात ही वांगी तुम्हाला जबऱ्या आनंद देणार आहेत....

२) आता या वांग्यांना धारदार सुरीने उभे क्रॉस दोन  छेद द्या...
अगदी खालपर्यंत छेद नेऊ नका नाहीतर नंतर भरल्यावर स्टफिंग निसटून जाईल...
आता ही वांगी किंचित गरम पाणी करून त्यात २ चमचे मीठ घालून त्यात पूर्ण बुडवून ठेवा ...तब्बल २० मिनिटे

३) दोन चमचे तेल जाड बुडाच्या भांड्यात तापवा आणि तापल्यावर  त्यात हिंग टाकून हलकेच परतून घ्या...
आता त्यात सगळा कांदा टाकून मंद अग्नीवर कांदा सोनेरी होईस्तोवर परतून घ्या. आता आलं आणि लसूण टाकून हलक्या हातांनी साधारण एक-दीड मिनिट परतून घ्या.

४) आता यात धने आणि जिरे घालून दोन मिनिटे व्यवस्थीत परता.
आता खसखस तीळ आणि खवलेला नारळ घालून खसखस छान लाल होईस्तोवर परता...
हे परतत असतानाच अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा साखर घालून परता...

सतत.... न थांबता परतत राहा...
खसखस घातल्यामुळे हे मिश्रण खाली चिकटू शकते...
म्हणून न थांबता परतत रहा....साधारण २ मिनिटे
साखर आणि मीठ घालून परतल्यावर पाणी सुटेल...
सुटायला हवे...
हे पाणी सुटायलाच हवे नाहीतर आधी घातलेले जिन्नस खाली चिकटतील आणि करपतील...
हे टाळण्यासाठी वाटल्यास अजून अर्धा चमचा साखर घाला...मीठ वाढवू नका...


आता हे मिश्रण थंड करत ठेवा...
आणि थंड झाल्यावर साधारण १० चमचे गरम पाणी घालून मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्या...
ही पेस्ट साधारण घट्ट व्हायला हवी...
वांग्यांच्या आत भारता येण्यायेवढी...

५) आता मिक्सर मधून काढलेली पेस्ट एका प्लेट मध्ये घ्या आणि त्यात शेंगदाण्याचा कुट , लाल तिखट पावडर, मीठ आणि ३ चमचे चिंचेचा कोळ घालून मस्त हलक्या हातांनी मिक्स करून घ्या...हे तयार झाले आपले स्टफिंग



६) आता वांगी पाण्याबाहेर काढून कोरडी करून घ्या आणि मगाशी आपण ज्या चिरा दिल्या आहेत त्यामध्ये हे स्टफिंग हळुवार हातांनी दाबून भरून घ्या....

७) उरलेले तेल मगासच्याच भांड्यात घालून मंद अग्नीवर तापू द्या आणि तापल्यावर त्यात आधी धुतलेली कडीपत्याची पाने घाला...एक दोन वेळा परता आणि आता उभ्या चिरलेल्या लाल मिरच्या यात घालून मस्त परतून घ्यायला सुरुवात करा...
लाल मिरच्या काळसर होईस्तोवर परतत रहा...पण मंद अग्नीवर...अजिबात अग्नी वाढवू नका...अन्यथा मिरच्या काळ्या होतील पण या मिरच्यांचा तिखट स्वादाचा अंश तेलात उतरणार नाही

८) आता यात  मिरच्या काळसर झाल्यावर उरलेला चिंचेचा कोळ आणि  उरलेले स्टफिंग टाकून जरा व्यवस्थित परतून घ्या...
आणि सर्वात शेवटी आता या भांड्यात आपण भरलेली वांगी हलक्या हातानी, पूर्ण भांड व्यापेल अशी पसरून ठेवा...
भांड्यावर झाकण ठेवा...
मंद अग्नीवर साधारण १५/२० मिनिटे वांगी शिजू द्या...
आता झाकण काढून भांड्यातल मिश्रण हलक्या हातांनी वान्ग्यांवर मस्तपैकी फिरवा...

आणि आता पुन्हा ही वांगी फक्त ५ मिनिटे अग्नीवर ठेवा...

कोथिंबीर स्प्रिन्कला...

झाली आपली "स्टफ वांगी" तयार.....

मस्त प्लेटिंग करा...

गरमागरम वाफाळलेला मोकळा भात प्लेट मध्ये घ्या...मधोमध
त्यावर ही वांगी, भांड्यात खाली प्रोसेस झालेल्या स्टफिंग सोबत, भातावर हलकेच प्लेस करा...
सोबत कांद्याच्या गोल चकत्या, आवडत असेल तर टोमाटो आणि लिंबू घ्या...

घरातल्या सगळ्यांना बोलवा...

घोटभर पाणी प्या...
मस्त छान सुवासांच्या सान्निध्यात प्रसन्न चित्ताने भोजन मंत्र म्हणा...
आणि आता...

आक्रमण.................

आवडत असेल तर वांग्यांवर मस्त लिंबू पिळा थोडासा...
चमच्याच्या सहाय्याने स्टफिंग सकट वांग्याचा एक तुकडा तोडा...त्या सोबत गरमागरम भात त्या सोबत घ्या आणि मस्त हा घास तोंडात सरकवा...डोळे मिता...दोन छार वेळा चावल्यावर...कसं वाटतंय ?

भन्नाट ना ?

एन्जॉय करा......

एक विनंती...
ही भाजी डब्यात घेवून जावू नका...
गरमागरमच छान लागते...
आणि टीव्ही पाहात पाहात हि भाजी खावू नका...
एक घास घेतल्यावर जो काही स्वाद हि भाजी तोंडामध्ये तयार करते त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर टीव्ही बंद करा...
आणि आता सावकाश जेवा......

वेडे व्हा..वेडे करा
खुप खा...खूप जगा   

रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....

भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा



देव बरा करो.........












No comments:

Post a Comment